महाराष्ट्राची लोकप्रिय प्रेरणादायी लेखमाला भाग २

सर्वाधिक सुवर्णपदक विजेता धावपटू पश्चिम जमैकाचा उसेन बोल्ट

लेखन : अशोक लक्ष्मण कुमावत
संवाद : 9881856327

यशाचं उत्तुंग शिखर गाठायचे स्वप्न उराशी बाळगूनच तो लहानपणापासूनच एक एक पाय लांब फेकण्याचा सराव करत होता. नशीब काय देणार त्यापेक्षा कर्तृत्वाची उत्तुंग झेप घेण्यासाठी तो नेहमी चार पावले मागे सरकून नशिबाला पकडण्यासाठी त्यावर झालंग लावत होता. अखेर वयाच्या 18 व्या वर्षी त्या उमद्या तरुणाला ऑलिम्पिक स्पर्धेत आपलं नशीब अजमावण्याची आणि अंगभूत गुण दाखविण्याची संधी मिळाली. अशी संधी लाखातून एकाला मिळते. निश्चितच त्याला त्या संधीचे सोने करायचे होते पण कर्तृत्व हरले आणि नशीब जिंकले. त्या स्पर्धेत तो  अपयशाचा धनी ठरला. त्यानं ते  अपयश धुवून काढण्याचा चंग बांधला. “मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही…..” तो मनातून हरलाच नाही. आणि एक दिवस तो जगजेत्ता झाला.

त्याच्या जन्माचीही न्यारीच चित्तरकथा होती. कोसो मैल दूर पाण्यासाठी भटकंती करत पूर्ण गाव पाण्याच्या एका थेंबासाठी व्याकुळ होत होता. घरात एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा धान्याचा कण नसायचा. बेरोजगारी राक्षसी रूप धारण करीत गावाभोवती पहारा देऊन गावाला छळवत होती. अशा एका दुर्गम खेडेगावात त्याचा जन्म गरिबीच्या खोल डोहातच झाला. लहानपणापासून दारिद्र्याचे चटके सहन करत तो मोठा होत होता. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्याच्या नशिबी अनेक शूद्र कामे करण्याची वेळ आली. कधी कधी तर दारू, विडी आणि सिगारेट यांची विक्री त्याला करावी लागली. मैदानी खेळाबरोबर क्रिकेट आणि फुटबॉल हा त्याचा आवडता छंद होता.  वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत त्याने आपली कर्तृत्वाची यशाची मोहोर धावण्याच्या स्पर्धेवर उमटवली होती. तो एक उत्तम धावपटू म्हणून उदयास येत  होता. क्रिकेटच्या वेडापायी त्याचं धावण्याकडं थोडं दुर्लक्ष झालं होतं. पण जाणकार शिल्पकाराने वेळीच त्याची गुणांची मूर्ती इतर नको असलेले भाग छाटून उत्तम शिल्प चितारले. शिक्षकांनी त्याचं सर्व लक्ष फक्त धावण्याकडे ठेवायला सांगितले.

गुरूंच्या आज्ञेचे पालन करत त्यांच्या पाठांचे पारायण करत वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत त्याने अनेक धावण्याच्या स्पर्धा गाजवल्या. उत्तम धावपटू म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्याच्या भरीव कामगिरीमुळे त्याला 2004 च्या अथेन्स ऑलम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. एवढ्या कमी वयात मिळालेले देशाचे प्रतिनिधित्व, अमाप पैसा, नावलौकिक, अनेक तोडलेले रेकॉर्ड हे त्याला अहंकाराच्या शिखरावर घेऊन गेले. मी पणाच्या गर्तेत हरवलेला, उत्तुंग भरारी घेणारा तो गरुड  धाडकन कोसळला. गुडघ्याच्या त्रासाचा तो बळी ठरला. चाहत्यांची आणि देशाची त्याने घोर निराशा केली होती. त्याच्या पदरी अपयशाचे जहरी माप पडले. डोक्याला दोन्ही हात लावून तो यशवंत खेळाडू खांबासारखा धाडदिशी मैदानातच कोसळला.
ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत असेल, तर ते ज्ञान विष आहे…!! परंतु ज्ञाना नंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे…!!

आता त्याच्या अहंकाराची त्याला जाणीव झाली होती. माणूस क्षणार्धात कसा संपून जाऊ शकतो हे तो स्वतःच उदाहरण झाला होता. आता तो स्वतःच्या आत डोकावून चुकांचे आत्मपरीक्षण करू लागला. पुन्हा कधी कर्तृत्वाशी प्रतारणा करायची नाही, अहंकार गाडून टाकायचा असे ठरवत तो पुन्हा सज्ज झाला. झालेला पराभव त्याच्या जिव्हारी लागला होता.
एकदा नाही तर दोन वेळा गुढघ्याच्या त्रासाने तो हैराण झाला होता. जीव नकोसा होत होता. वेदना असह्य होत असतांनाही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. अहोरात्र मेहनत करत प्रचंड आत्मविश्वास व जिद्दीने तो  2008 च्या बीजिंग ऑलम्पिक स्पर्धेत उतरला. देशासाठी तो प्रचंड ताकतीने स्वतःला धावण्यात झोकून यशवंत बनला. तीन सुवर्णपदकं त्याने आपल्या देशाच्या शिरपेचात मानानं खोवली. आता त्याने स्वतःला अहंकाराचा वारा लागू दिला नाही. सतत झगडत न थांबता पुढे 2012 आणि 2016 च्या ऑलम्पिक स्पर्धेत त्याने यशाचा झेंडा उंचच ठेवला. त्याने चक्क नऊ सुवर्णपदक आपल्या नावावर कोरली. तो जगज्जेता  ऑलम्पिक स्पर्धेतील सर्वाधिक सुवर्णपदक विजेता धावपटू म्हणजेच पश्चिम जमैकाचा उसेन बोल्ट होय.

कोणतीही गोष्ट दोन वेळा जन्माला येते. यशही अगोदर मनात जन्माला येतं आणि मग ते प्रत्यक्षात उतरते. एकदा यशस्वी होण्याचे स्वप्न पाहिले की मग मात्र बेभानपणे कष्ट करावेच लागतात.

चुका होत जातील तु सुधारत जा
वाटा सापडत जातील तु शोधत जा
माणसं बदलत जातील तु स्वीकारीत जा
परिस्थिति शिकवत जाईल तु शिकत जा
येणारे दिवस निघुन जातील तू क्षण जपत जा
विश्वास तोडुन अनेक जातील तु सावरत जा
प्रसंग परीक्षा घेत जाईल तु क्षमता दाखवत जा  ( क्रमश: )

( लेखक अशोक लक्ष्मण कुमावत हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक असून लेखक, कवी, सूत्रसंचालक, वक्ता म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. )