इगतपुरीनामा न्यूज दि. ७ : कोरोना विषाणूच्या विळख्यातून इगतपुरी तालुक्याची सुटका होते आहे असे चित्र निर्माण होवू लागले असतांनाच काल अनाहूतपणे डेल्टा विषाणूने तालुक्यात शिरकाव केला आहे. काल आलेल्या अहवालानुसार डेल्टा विषाणूचे नाशिक जिल्ह्यात तीस रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण घोटी शहरातील असल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. आरोग्य यंत्रणेच्या अहवालाने सुध्दा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली असून रुग्ण संख्या पुन्हा वाढते की काय अशी भिती निर्माण झाली आहे. शिवाय हा नवा डेल्टा व्हेरीयेंट जुन्या सगळ्या प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले असल्याने तालुक्यासाठी आता या नव्या विषाणूची एन्ट्री धोक्याची चाहूल देणारी ठरू पाहत आहे.
गेले काही दिवस तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या घटली आहे. आज तालुक्याची रुग्ण संख्या सुदैवाने एक आकडी आहे. याच पार्श्वभूमीवर तालुका “अनलॉक” करण्यात आला. अनलॉकला किमान पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही रुग्णसंख्या मात्र स्थिर असल्याने तालुक्याने सुटकेचा निःश्वास टाकला न टाकला तोच काल कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या डेल्टा विषाणूची लागण झालेला एक रुग्ण घोटी शहरातील असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण होतो की काय अशी धास्ती निर्माण झाली आहे.
दरम्यान तालुक्यामध्ये अजून तरी कोरोनाचा गंभीर अवस्थेत असलेला रुग्ण आढळून आलेला नाही, त्यामुळे नव्या विषाणूला घाबरून जावू नये, मात्र सतर्कता बाळगावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.
“घोटीचा बाजार” भरवतोय धडकी
इगतपुरी तालुक्यासाठीच नव्हे तर लागूनच असलेल्या नगर जिल्ह्यातील राजूर अकोले परिसरापासून ते जव्हार-मोखाडा पर्यंतच्या गावांसाठी घोटी ही प्रमुख बाजारपेठ आहे. त्यामुळे घोटी बाजारपेठेत नेहमीच गर्दी असते. शिवाय शेजारच्या दोन जिल्ह्यांसह मोठ्या परिसरातील नागरिक या बाजारपेठेत येत असतात. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी गर्दी होते, आणि त्यामुळेच विषाणूचा फैलाव होण्याची शक्यताही जास्त बळावते. घोटीतील बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन गरजेचे असून यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
विकेंड पर्यटन : इकडे आड तिकडे विहीर
सध्या इगतपुरी तालुक्यातील निसर्ग सौंदर्य ऐन बहरात आहे. त्यामुळे पर्यटकांना याची भुरळ न पडली तरच नवल! आठवडाभर पर्यटकांची ये जा सुरू असतेच, मात्र वीकेंडला या संख्येत मोठी वाढ होते. त्यामुळे बाहेरगावाहून विशेषतः मुंबई आणि नाशिक कडून पर्यटक मोठ्या संख्येने इगतपुरीतले सृष्टी सौंदर्य भरभरून न्याहाळण्यासाठी येत असतात. मात्र या पर्यटकांची कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पर्यटकांकडून सुध्दा कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांकडून शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करून पर्यटकांना मज्जाव केला जातो. मात्र तरीही तुरळक गर्दी सगळीकडे दिसत असतेच.
पर्यटकांना मज्जाव करणे आवश्यक असले तरीही येणाऱ्या पर्यटकांवर बऱ्याच स्थानिक रहिवाशांचा रोजगार अवलंबून आहे. पर्यटकांना मज्जाव केला तर या स्थानिक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहू पाहत आहे, आणि मज्जाव न करावा तर कोरोना संसर्गाची जोखीम पत्करावी लागत आहे. यामुळे पोलीस आणि महसूल यंत्रणा दोन्हीकडून कात्रीत सापडत असून दोन्हींचा सुवर्णमध्य साधण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तालुका वासियांचे आरोग्य सांभाळणे गरजेचे असतांनाच स्थानिकांचा रोजगार हिरावला जावू नये याचीही काळजी घेणे हे यंत्रणेपुढील मोठे आव्हान आहे.