के. के. वाघ कॉलेज ते हॉटेल जत्रा दरम्यानचा उड्डाणपुल आठवडाभरात वाहतुकीसाठी होणार खुला : खासदार हेमंत गोडसे यांची माहिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई–नाका, द्वारका, आडगाव नाका, औरंगाबाद नाका, के. के. वाघ महाविद्यालय, अमृतधाम, बळी महाराज मंदीर, हॉटेल जत्रा या परिसरातील महामार्गावर वाहतुकीचा फार ताण होता. त्यामुळे सतत होणाऱ्या अपघातांना आळा बसावा, या महामार्गावरील वाहतूक वेगाने तसेच विनाअडथळा व्हावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा आणि प्रयत्न केले होते. त्यामुळेच साकारण्यात आलेल्या के. के. वाघ कॉलेज ते हॉटेल जत्रा या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. शहरवासियांच्या आणि वाहतूक धारकांच्या सेवेसाठी हा उड्डाणपुल येत्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आडगाव नाका ते के. के. वाघ कॉलेज, औरंगाबाद नाका, अमृतधाम, बळी महाराज मंदिर हॉटेल जत्रा, मेडीकल कॉलेज या परिसरात मोठ्या संख्येने शासकीय कॉलेज, महाविद्यालये या परिसरात महामार्गावर नियमित विद्यार्थ्यांची वर्दळ असते. याशिवाय आडगाव, जानोरी, दहावा मैल, सैय्यद पिंप्री आदी ग्रामीण भागातील शेतकरी देखील आपला शेततमाल पंचवटी मार्केटला विक्रीसाठी याच महामार्गावरुन आणतात. त्यामुळे अवजड वाहने तसेच शेतमालाची वाहने यांमुळे नियमित वाहनांच्या लांबचलांब रांगा याठिकाणी लागलेल्या दिसतात. या भागात उड्डाणपुल नसल्याने व सदरचा महामार्ग अरुंद महामार्ग असल्याने या महामार्गावर तास्‌नतास कोंडीची समस्या निर्माण होत होती. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे आजपर्यंत अनेकांना कायमस्वरुपी अपगंत्व आले असून अनेकांचे प्राण देखील गेले आहेत. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेवून खासदार हेमंत गोडसे यांनी या उड्डाणपुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन घेतला होता.

या उड्डाणपुलामुळे मुंबईनाका, द्वारका, आडगाव नाका, औरंगाबाद नाका, अमृतधाम, बळी मंदिर, जत्रा हॉटेल, आडगाव मेडिकल कॉलेज या ठिकाणच्या चौकांमधील वाहतूक ठप्प होणार नाही. तसेच महामार्गावरील वाहतूक २४ तास सुरळीत असेल. या बरोबरच अपघातात हकनाक कुणाचाही बळी जाणार नाही. वाहतूक विना अडथळा सुरु होणार असल्याने वाहन धारकांची कुंचबणा थांबणार आहे. पुलाच्या कामांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे सहकार्य तर पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसातच उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

दृष्टिक्षेपात उड्डाणपुल

के. के. वाघ कॉलेज ते हॉटेल जत्रा पर्यंत साधारण साडेतीन किलोमीटरचा हा उड्डाणपुल आहे. अमृतधाम आणि हॉटेल जत्रा या ठिकाणी दोन्ही बाजुस पुलावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी रॅम्प उभारण्यात आले आहे. या रम्पची रुंदी १९.७७ इतकी आहे. प्रत्येक चाळीस मीटरच्या एक स्पॅन असे पावणे चार किमलोमीटर उड्डाणपुलासाठी ७१ स्पॅन उभारण्यात आले आहे. या उड्डाणपुलासाठी सुमारे चारशे कोटी रुपये खर्च झाला असून पुलाचे काम पूर्ण होण्यास ३८ महिन्यांचा कलावधी लागला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस सर्व्हीस रोड असणार आहे. अहमदाबाद येथील दिनेश अग्रवाल यांच्या कंपनीने या पुलाचे काम पूर्ण केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!