इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऐतिहासिक भात लढ्याचे आद्य प्रवर्तक कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉ. क्षमा गोवर्धने शेलार यांनी कर्मवीर गोवर्धने यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगून भातलढयाच्या संदर्भातील इतिहास विशद केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे होते.
याप्रसंगी शांताराम कोकणे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, समाधान गुंजाळ, डॉ. संजय शेलार, वैशाली आडके, उत्तम गोवर्धने, जयंत गोवर्धने, प्रतिभा गोवर्धने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी स्वागतगीत व समाज गीत सादर होऊन कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. संचालक भाऊसाहेब खातळे, डॉ. क्षमा गोवर्धने शेलार तसेच ऑनलाईन भाषण स्पर्धेतील विद्यार्थी व महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. गोवर्धने कुटुंबाच्या वतीने विविध शाखेत व वर्गात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार रोख पारितोषिके देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. भाऊसाहेब खातळे, डॉ. क्षमा गोवर्धने शेलार, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड , जयंत गोवर्धने यांची कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या कार्याबद्दल मनोगते संपन्न झाली. डॉ. आर. डी. शिंदे यांनी तयार केलेल्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी प्रशांत गोवर्धने, नितीन गोवर्धने, स्वप्नील गोवर्धने, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. यू . एन. सांगळे यांनी मानले.