भरवीर खुर्द भागात बिबट्याची दहशत ; १३ शेळ्यांवर हल्ला करून बिबट्या मोकाट

भाऊराव रोंगटे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील शिंदे मळा ( टेंभाडी ) भागात मंगळवारी रात्री एक ते दोनच्या सुमारास बाळू किसन शिंदे यांच्या घराजवळील शेळी शेडमधुन बिबट्याने १३ शेळ्या फस्त केल्या आहेत. १३ शेळ्यांपैकी ८ शेळ्या मृतावस्थेत सापडल्या असुन ५ शेळ्या मात्र सापडल्या नाहीत. वनविभागाने भेट देऊन पंचनामा केला आहे. ह्या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याने दहशत माजवलेली असुन भरवीर खुर्द आणि परिसरात भितीचे सावट पसरलेले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा  लावण्याची मागणी ह्या भागातील नागरिकांकडून होत आहे.

घटनेची खबर मिळाल्यावर घटनास्थळी इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. पाटील यांनी भेट देऊन पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. वन परिमंडळ अधिकारी डी. एस. ढोन्नर, वनरक्षक एफ. जे. सैय्यद, एम. जी. पाडवी, आर. टी. पाठक, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. तळपाडे, पी. एच. टोचे आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासुन साकुर, कवडदरा, भरवीर खुर्द, चौरेवाडी, जुंदरेवाडी, घोटी खुर्द गावांसह परिसरात बिबट्याचे दर्शन कोणत्या ना कोणत्या ठिकाणी होत असते. कधी सायंकाळी तर कधी सकाळी आमच्या भागात अनेक दिवसांपासुन दोन ते तीन बिबट्यांना पाहण्यात आले आहे. खुप मोठ्या प्रमाणात माझे आर्थिक नुकसान झाले असुन वनविभागाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी.
- बाळू किसन शिंदे, शेळी मालक
आमच्या भागात पावसामुळे आणि अन्य तांत्रिक अडचणीमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला त्यावेळी वीज गायब होती. कदाचित वीज खंडित नसती तर ही घटना घडली नसती. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी.
- मनिषा भाऊराव रोंगटे, उपसरपंच भरविर खुर्द कवडदरा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!