डिझेल चोरी करणाऱ्या संशयित टोळक्याकडून पोलिसांना मारहाण ; ६ जण अटक तर ५ जण फरार
इगतपुरी तालुक्यातील गंभीरवाडी येथील प्रकार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

घोटी पोलीस ठाण्यातील २ पोलीस कर्मचारी लोक न्यायालयाच्या नोटीसा बजावण्यासाठी गंभीरवाडी परिसरातुन जात होते. यावेळी समृध्दी महामार्गाचे काम करणाऱ्या एका हायवा गाडी जवळ काही अज्ञात संशयित डिझेल चोरी करीत असल्याचे त्यांना आढळुन आले. त्यांनी याबाबत टोळक्याला हटकले असता टोळक्याने पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, घोटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बाळु दशरथ डहाळे व बाळु संतु लगड हे दि. ३० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गंभीरवाडी येथे लोक न्यायालयाच्या नोटीसा बजवण्यासाठी जात होते. गंभीरवाडी गावाजवळ रात्रीच्या वेळी अंधारात समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या हायवा गाडी क्र. एम. एच. ०४, जे. के. ५६४३ व गाडी क्र. एम. एच. ०४, जे. के. ५६४० या गाडीचे चालक व क्लिनर यांच्यासह दहा ते बारा इसम डिझेल टँक जवळ उभे असल्याचे त्यांना निदर्शनास आले. यावेळो पोलीस कर्मचाऱ्यांना डिझेल चोरीचा संशय आल्याने त्यांना हटकत विचारपुस केली. त्यांना याचा राग येऊन १० ते १२ टोळक्याच्या जमावाने पोलिसांनाच जबर मारहाण केली.

सध्या नागपुर मुंबई समृध्दी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. येथील काम करणाऱ्या ट्रक मधुन हजारो लिटर डिझेल चोरीच्या घटना होत ऐकिवात असल्याने पोलीसांनी चौकशी केली. या घटनेतील सचिन गोविंद नवाळे, अनिल गणपत डगळे, गणेश गेणु नवाळे, बाळु सोपान नवाळे, पांडु गणपत डगळे, साहेबराव अंकुश भाकरे सर्व रा. गंभीरवाडी ता. इगतपुरी यांना पोलीसांनी अटक केली आहे. चार ते पाच संशयित फरार आहेत. अटक केलेल्या संशयितांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणुन भादवि कलम ३५३, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी केशव शिवाजी बस्ते यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फरार असलेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत असुन या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाकडून सुरू आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!