रस्ता ? खड्ड्यात !
पाणी ? आठवड्यातून ३ दिवस !
इगतपुरी ? नाही नाही, ही तर समस्यांची बजबजपुरी !
देवा ! आता तूच वाचव रे बाबा या सगळ्यातून !

लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा

सध्या इगतपुरी शहरात इतक्या समस्या आहेत, की सगळ्या लिहून काढायच्या म्हटल्या तरी लिहितांना दमछाक होते! फार काही अपेक्षा नाहीयेत इगतपुरीकरांच्या! पण इथे मूलभूत सुविधांची सुध्दा गेली कित्येक वर्षे बोंब आहे! निगरगट्ट प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेतच, पण त्यांच्याहून जास्त जबाबदार कोण असेल तर तो सर्वसामान्य इगतपुरीकर ! इगतपुरी शहरामध्ये विविध प्रकारच्या अनिर्णित समस्या आणि न सुटलेल्या प्रश्नांची मोठी संख्या आहे. सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याला जबाबदार आहेच..पण सर्वात जास्त जबाबदार इगतपुरी शहरात वास्तव्य करणारे आणि कोणतीही संवेदनशीलता नसलेले नागरिक आहेत. गेल्या अनेक वर्षात फक्त अणि फक्त अन्याय सहन करणारे इथले नागरिक अन्याय मोडून काढायला परमेश्वरी अवताराची वाट पाहत असावेत की काय अशी शंका घ्यायला जागा आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या आणि धरणांची मुबलकता असणाऱ्या इगतपुरी शहरात भर पावसाळ्यात सुद्धा केवळ तीन दिवसच पिण्यासाठी पाणी येते. चंद्रावर भ्रमण करण्याचा अनुभव देणारे शेकडो मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेले असून सुद्धा एकही इगतपुरीकराचे रक्त उसळत नाही. राज्यातील टॉप पर्यटनस्थळ असणाऱ्या इगतपुरीत आल्यावर ब्रिटिशकाळापासून आजही तसेच राहिलेले शहर म्हणून इगतपुरी दिसते. विकासाच्या नावाने बोंबाबोंब असूनही इथला नागरिक निमूटपणाने सहन करतोय. हे लक्षण चांगले माहित असल्याने जबाबदार असणारे अन्य घटक निश्चिन्त आहेत. या शहरात अशा शेकडो समस्या आणि प्रश्नांचा डोंगर उभा राहिला तरी इगतपुरीकर नागरिक त्यावर ब्र शब्द बोलणार नाही. आता सांगा सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यापैकी सर्वात जास्त जबाबदार कोण ?

अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. अन्याय सहन केल्याने करत राहिल्याने, अन्याय करणारे बलवान होतात. ते अधिकाधिक अन्याय करत राहतात. अन्याय करणाऱ्यांना अन्याय सहन करणारेच खतपाणी घालतात. त्यांना मोठे करतात. म्हणूनच अन्याय सहन करणाराच मोठा गुन्हेगार असतो. प्रथम अन्याय सहन करणाऱ्याने अन्याय करणाऱ्यांविरुद्ध बंड केले पाहिजे. आवाज उठवला पाहिजे. तरच अन्याय करणारे संपुष्टात येतील. अन्याय सहन करणारे जर पाय रोवून उभे राहिले, अन्याय अत्याचाराविरुद्ध सामना करण्यासाठी बाहेर पडले तर, अन्याय करणारे क्षणार्थात नेस्तनाबूत होतील. यात तिळमात्र शंका नाही. मुळातच अन्याय करणाऱ्यांची भिस्त ही अन्याय सहन करीत राहीपर्यंत टिकते. अन्यायाविरुद्ध आवाज उठविल्यानंतर मात्र अन्याय करणाऱ्यांची पळताभुई थोडी होते, ही वस्तुस्थिती आहे. वेळोवेळी घडणाऱ्या घटनांमधून हे स्पष्ट ही झाले आहे. म्हणूनच प्रथमतः अन्याय सहन करणाऱ्यांनी न घाबरता अगदी निर्भिडपणे अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात कुठल्या ना कुठल्या मार्गाने आवाज उठविला पाहिजे.अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी थोडयाश्या धारिष्टयाची गरज आहे आणि हे धारिष्टय सर्वांमध्ये आहे.अन्यायाविरुद्ध खवळून उठायला हवे. जो निमूटपणे अन्याय सहन करतो, तो त्याच्या उभ्या आयुष्यात काहीही करू शकत नाही. म्हणूनच प्रत्येकाने अन्याय – अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायला हवा आणि समाजानेच तो आवाज ‘बुलंद’ करायला हवा.

इगतपुरीकर नागरिक सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी पुढे होऊन निवेदन किंवा तक्रार करीत नाही. आंदोलन तर दूरच… कोणी याबाबत पुढं आलं की त्याला सहकार्य न करता एकटं पाडलं जातं. यामुळे संबंधित जबाबदार घटक निर्ढावले आहेत. इगतपुरी शहराचे दुर्दैव हे आहे की, ज्या जनतेसाठी हे सगळं चाललं आहे ती जनता कधीच कुठल्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. अशा भयाण प्रश्नांवर जनतेकडून गांभीर्याने आवाज उठवला जात नाही. ठराविक जागरूक कार्यकर्ते आणि काही लोकप्रतिनिधी अशा विषयांवर बोलतात. मात्र खरी अपेक्षा संबंधित भागातल्या जनतेने अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची आहे. ती कधीच पूर्ण होत नाही. काही दिवसातच ह्याचा सगळ्यांना विसर पडतो. शासनाला जनतेचा रेटा नेमका कसा असतो हे कोणीही दाखवत नाही. मागील पार्श्वभूमी पाहता इथली जनता करून करून काय करणार ? ह्याचा अभ्यास संबंधितांचा चांगलाच झाला आहे. त्यामुळे रस्ते आणि पाणी प्रश्नांची दाहकता काहीही राहिलेली नाही. तात्पर्य एवढेच की, जनतेने अन्यायाविरुद्ध पेटून उठावे असे वाटत असले तरी इगतपुरीकर जनता काहीही बोलणार नाही हे मला माहित आहे. राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि अन्य कोणी मदत करो की न करो पण आपल्या हक्कांसाठी आपणच शासनाला कसे नमवता येईल याकडे नागरिकांनी गंभीरपणे लक्ष घालायला हवे. तरच आपला प्रश्न कायमचा निकाली निघेल यात शंका नसली तरी तो दिवस कधी येईल ?

Similar Posts

error: Content is protected !!