“माझ्या शेजाऱ्याला सांगतो मी बया…” : “जीवासाठी लय बेस आहे बया…”

ग्रामीण शहरी भागात बहुढंगी गीताची धमाल : गाणे ऐकल्यावर नाचण्याची होईल कमाल

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

आदिवासी भागामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत अफवा पसरल्या आहेत. शहरी भागात सुद्धा हे लोन पसरले आहे. गैरसमज आणि भीती दूर व्हावी म्हणून ग्रामीण शैलीत भारुड आणि रॅप याचे मिश्रण अर्थात रिमिक्स करीत जनजागृती सुरू आहे. पेठ तालुक्यातील बोरवठ शाळेतील शिक्षक प्रमोद अहिरे यांनी ‘माझ्या शेजाऱ्याला सांगतो मी बया’ या गाण्यातून जनजागृती करण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न केला आहे. ‘माझ्या शेजाऱ्याला सांगतो मी बया, लस घेतली दोनदा मी बया, लय गुणकारी आहे बया, जीवासाठी लय बेस आहे बया’ हे गीत एज्यु पर्व यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहे. ह्या अफलातून गीताला आदिवासी व शहरी भागात चांगला  प्रतिसाद मिळतोय. भारत ज्ञान विज्ञान समुदाय नाशिक या संस्थेने या गाण्याची निर्मिती केली आहे. जनवाचन, महिला सक्षमीकरण, आरोग्य साक्षरता, शिक्षण, शेती, विज्ञान संवाद, तंत्रज्ञान प्रशिक्षण, कला जथ्थे अशा अनेक विषयांवर ही संघटना काम करते. सध्या आरोग्य साक्षरता या विषयाअंतर्गत सांस्कृतिक अंगाने जनजागृती करण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे.

पारंपरिक लोकगीत आणि आधुनिक रॅप यांचा मेळ घालत हे संवादी गीत प्रमोद अहिरे यांनी तयार केले आहे. लोककलेला आधुनिकतेचा टच दिल्याने वृद्धांबरोबरच तरुणांच्याही पसंतीस हे गीत उतरले आहे. गाण्यात ग्रामीण-आदिवासी बोलीबरोबरच शहरी भाषेचा समावेश आहे. त्यामुळे सर्व स्तरातील लोकांना या गाण्याने भुरळ घातली आहे. या गाण्यामुळे लसीकरणाला नक्कीच चालना मिळेल अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स नागरिकांनी दिल्या आहेत. गीतावर आपसूकच पाय थिरकतील अशी “भारुड विथ रॅप” रचना आहे. हे गाणे निलेश गरुड यांनी संगीतबद्ध केले असून राहुल लेहनार, प्रमोद अहिरे, अर्चना गरुड, प्रवीण देवरे, कैलास सोनवणे, विश्वास वाघमारे अशा गायकांनी हे गाणे सादर केले आहे. या चित्रफितीचे लोकार्पण शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते झाले आहे.

अप्रतिम भारुड विथ रॅप पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पाहता आणि ऐकता येईल.

https://youtu.be/l8vByRkJshU