नाशिकचे नियोजित साहित्य संमेलन रद्द करून त्या निधीतून पूरग्रस्तांचे पुनर्वसन करा – महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर नाशिकला होणारे साहित्य संमेलन रद्द करण्यात आले होते. त्यात तिसऱ्या लाटेची भीती समोर आहे. अशा परिस्थितीत नाशिकचे साहित्य संमेलन होत नसेल तर त्यासाठी जमा केलेल्या कोट्यवधीच्या निधीतून कोकण भागातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचे पुनवर्सन करा अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी केली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात नाशिकला होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यजमानपद नाशिक जिल्हा भूषविणार होता. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला होता. यासाठी आमदार खासदारांनीही भरीव निधीची मदत दिला आहे. त्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने हे संमेलन काही महिन्यांसाठी पुढे ढकलले गेले. नाशिकला साहित्य संमेलन झाले तर मोठ्या संख्येने राज्यातून साहित्यप्रेमींची गर्दी होईल. अनेक वक्ते, कवी, लेखक मोठ्या प्रमाणावर नाशकात दाखल होतील. त्यामुळे सध्या तिसऱ्या कोरोना लाटेच्या अनुषंगाने संमेलनास महाराष्ट्र सरकार परवानगी देणार नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी लक्षात घेता राज्य सरकार, सामाजिक संघटना, दानशूर नागरिक यांनी आपल्या परीने सर्वतोपरी मदत पूरग्रस्तांसाठी करणे आवश्यक आहे. शासनाने कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता नियोजित साहित्य संमेलन रद्द करावे. यासाठी जमा केलेला कोट्यावधीचा निधी पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी केली आहे.

सध्या राज्यात अतिवृष्टीने मोठी हानी झाली असून रायगड जिल्ह्यात अख्खेच्या अख्खे गावच गिळंकृत झाले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर अजूनही पाण्याखाली आहेत. मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे. शेकडो कुटुंब उध्वस्त झाली आहेत. महापुरात संपूर्ण घर वाहून गेल्याने अनेक महिलावर्ग अंगावरच्या कपड्यांवर दिवस काढत आहेत. अस्मानी व नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी अशा काळात मदतीसाठी सर्वच घटकांनी पुढे येण्याची गरज आहे असे प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे म्हणाल्या.

गेल्या दोन वर्षांपूर्वी अमरावती येथे संपन्न झालेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या ६ व्या राष्ट्रीय अधिवेशनात कोल्हापूर,सांगली येथे महापुरातील आपत्तीग्रस्त नागरिकांना आपला पदर पसरवून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी मदत केली होती. संपूर्ण महाराष्ट्र भरातून जिजाऊ ब्रिगेडच्या महिला मदत पाठवत आहेत. सामाजिक भावना लक्षात घेता नाशिकचे साहित्य संमेलन जर होत नसेल तर त्यासाठी गोळा केलेल्या कोट्यवधीच्या निधीतून कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी सह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे. राज्य आपत्तीत सापडलेले असताना साहित्य संमेलन एक वर्ष नाही घेतले तर फारसे काही बिघडणार नाही.
- माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!