नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अंत न पाहता तात्काळ नुकसानभरपाई द्या : सरपंच परिषदेचे ना. झिरवाळ यांना मागण्यांचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा काढूनही कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई विमा कंपनीने दिलेली नाही. यामुळे पिकविम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. सगळे सोपस्कार करूनही पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्यामुळे शासनावरील विश्वस संपुष्टात आला आहे. शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाच्या भावना असल्याने ह्या क्षतीग्रस्त आक्रमक शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा. भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करावी. यापुढील काळात विमा कंपनीवर कठोर अंकुश ठेवावा अशी मागणी सरपंच परिषदेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष तथा माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. श्री. झिरवाळ यांनी याप्रकरणी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने असून हयगय करणाऱ्यांवर शासनाला कारवाई करण्यासाठी सूचना करणार आहोत. योग्य पाठपुरावा करून मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढू असा शब्द हरिश्चंद्र चव्हाण यांना दिला.

गेल्या वर्षी इगतपुरी तालुक्यातील भात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. कृषी अधिकारी, तलाठी यांनी पंचनामे करून अहवाल पाठवलेला आहे. मात्र संबंधित विमा कंपनीने अद्याप पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रडकुंडी येण्याची वेळ आली आहे. ह्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरपंच परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण यांनी विधानसभा उपाध्यक्षांना निवेदन दिले. यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते संदीप गुळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण आदींसह त्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!