इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त झाले असले तरी सामाजिक संवेदना जपणारे समाज भान अद्याप जागृत आहे. ह्या सामाजिक जाणिवेतून सर्व समाजाला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन करीत आहे. ह्या अनुषंगाने असोसिएशनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ हजारांची मदत दिली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हाती मदतीचा धनादेश सोपवण्यात आला. सर्व सेवनिवृत्तांचे मदतीचे हात निश्चितपणे कृतज्ञता व्यक्त करण्यास पात्र असल्याचे कौतुक जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
मागील दीड ते दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. यासह राज्यातील अनेक भागात नैसर्गिक आपत्तीलाही तोंड द्यावे लागत आहे. मागील आठवड्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले. या पुरात त्या त्या भागातील जनतेचे जीवनमान उध्वस्त झाले आहे. अशा भयावह परिस्थितीचा विचार करून नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. संघटनेचे माजी अध्यक्ष स्व. माधवराव भणगे यांच्या प्रेरणेने नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिक या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ हजार रक्कमेचा धनादेश नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव ( बाबा ) गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र बापू थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, संघटक प्रमुख ज्ञानेश्वर कासार, सुभाष कंकरेज, राजेंद्र अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.