इगतपुरी तालुका बेरोजगार मुक्तीसाठी युवकांनी एकत्र यावे : भूमिपूत्र फाऊंडेशनचे आवाहन ; विविध प्रकल्पांमुळे तालुक्यातील हजारो युवक बेरोजगार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

इगतपुरी तालुक्यातील विविध प्रकल्पासांठी शासनाने हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन बेरोजगारीवर मात करण्याचे आवाहन भूमिपूत्र फाऊंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष विनोद नाठे यांनी केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये शंभरच्या आसपास कारखाने आहेत. ह्या कारखान्यांमध्ये असलेल्या एकूण कामगारांच्या संख्येपैकी ८० टक्के रोजगार हा इगतपुरी तालुक्यातील युवकांना मिळावा. त्याचप्रमाणे जिंदाल कंपनीमध्ये पाच हजार परप्रांतीय कामगार काम करत असून इगतपुरी तालुक्यातील स्थानिक तरुणांना या ठिकाणी रोजगारापासून डावलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते की, परप्रांतीयांच्या जागी स्थानिकांना काम द्या, मग स्थानिक तरुणांना रोजगार का मिळत नाही ?  ५ हजार कामगारांपैकी किमान ८० टक्के रोजगार हा स्थानिक तरुणांना मिळावा असा शासनाचा अध्यादेश असतांना देखील तालुक्यातील युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी भात पिकाचे झालेले नुकसान बघता त्या तुलनेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. असे असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधी पिक विमा कंपनीच्या विरोधामध्ये निदर्शने करतांना दिसत नसून लढा उभा करत नसल्याचे भूमिपूत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद नाठे यांनी यावेळी सांगितले.

इगतपुरी तालुका देशामध्ये प्रकल्पग्रस्तांचा तालुका म्हणून फक्त ओळख मिळवून प्रसिद्ध आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या कुठे आहेत ? आधीच्याच प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या नाही सरकार रेल्वेसाठी, समृद्धीसाठी, धरणांसाठी, शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे प्रयोजन करत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष असल्याचे भूमिपूत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष नाठे यांनी सांगितले. यासाठी तालुक्यातील सर्व बेरोजगार युवकांनी एकत्र  येऊन बेरोजगारीवर मात करण्याचे आवाहन यावेळी भूमिपूत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद नाठे यांनी केले आहे.

वैतरणा धरणातून पाणी मुंबईला जाते मुंबई महानगरपालिकेमध्ये इगतपुरी तालुक्यातील मुलांना हक्काचा रोजगार का मिळत नाही यासाठी देखील तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज आहे. मुकणे धरणातून नाशिक महानगर पालिकेला पाणी दिले जाते. नाशिक महानगरपालिकेत इगतपुरी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या का नाही ? यासाठी देखील लढा उभा करण्याची गरज आहे. अशा अनेक समस्या तालुक्यांमध्ये असताना कोणीही या समस्यांकडे लक्ष देत नाही असेही त्यांनी शेवटी सांगितले.

शासनाने विविध प्रकल्पासांठी तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी आधीच संपादित केल्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना उदरनिर्वाहाचे काहीही साधन नाही. कमीतकमी तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच प्रकल्पग्रस्तांना पाटबंधारे विभाग, महानगरपालिकांमध्ये सामावून घ्यावे.
- विनोद नाठे, अध्यक्ष, भूमिपूत्र फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!