घोटी टोलनाक्याची खासदार करणार केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार
वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक ते कसारा घाट दरम्यान असंख्य खड्डे झाले असुन या खड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकजन मृत्युमुखी पडत आहे. या मार्गावरील घोटी येथील टोलनाका प्रशासन फक्त टोल वसुलीवर लक्ष केंद्रित करत असुन आधी रस्ता दुरुस्त करा व मगच टोल वसुली करा अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली. रस्ता दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष करत असेल तर वाहन धारकांनी अजिबात टोल भरू नका असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे. याबाबतची तक्रार त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक-इगतपुरी-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बोरटेंभा ते इगतपुरी या रस्त्याचे अवघे दोन महिन्यापुर्वीच काम झाले होते. मात्र केवळ दोनच महिन्यात या रस्त्याची पुर्णता: वाट लागली असुन रस्त्याची अगदी चाळण झाली आहे. रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेले असुन वाहने चावलणेही वाहन चालकांना जिकिरीचे झाले आहे. आपण खरचं महाराष्ट्राच्या राजधानीला तथा देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणाऱ्या मुंबई शहराच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच प्रवास करतोय ना अशी शंका वाहन धारकाच्यां मनात डोकावत आहे.
नाशिक-इगतपुरी-मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा व प्रचंड वर्दळीचा महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्यावर कामानिमित्त असंख्य वाहने रात्रंदिवस ये जा करत असतात. जनतेचा रस्त्यावरील प्रवास आधिकाधिक सुखकर व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासन एकीकडे रस्ते महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करत असतानांही रस्त्याचीं ही दुरावस्था पाहुन या निधीला अन्यत्र पाय फुटत तर नाही ना असा संतप्त सवाल नागरिक करत आहे.
विल्होळी पासुन ते कसारा घाट दरम्यान एक ते दिड फुटा पर्यंत असंख्य खड्डे पडले आहेत. यात सर्वात जास्त खड्डे विल्होळी, गोंदे, घोटी, बोरटेंभा, पिंप्रीसदो चौफुली, घाटनदेवी परिसरातील महामार्गावर पडले आहेत. या खड्यात पावसाचे पाणी साठल्यावर वाहन चालवतांना चालकाच्या लक्षात येत नसुन वाहनाचे चाक खड्यात गेल्यावर अपघात होत असुन रोज नाहक बळी जात आहे. तसेच वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने टोलनाका प्रशासाने त्वरीत रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालक करीत आहे.
नाशिक ते कसारा घाट दरम्यान पडलेल्या खड्यांबाबत लवकरच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करणार असुन यावर कायमस्वरूपी उपाय योजना कशी करता येईल याकडे लक्ष वेधणार आहे.
– हेमंत गोडसे, खासदार