बैल सजावट स्पर्धेच्या निमित्ताने माणिकखांबला चित्ताकर्षक बैलजोड्यांचे आकर्षण : स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन : ज्ञानेश्वर लहाने

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

दणदणीत खांद्यांचे भारदस्त आणि आकर्षक रंगाने रंगवलेले बैल, वेगवेगळ्या आकर्षक वस्तूंनी केलेली चित्ताकर्षक सजावट, बैलांवर लिहिलेले विविध सामाजिक संदेश, चिमुरड्या बालकांचा गजबजाट, ग्रामस्थांची अपरिमित गर्दी अशा अनेकानेक पैलूंनी इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथे बैल सजावट स्पर्धा संपन्न झाली. श्रीगणेश मित्र मंडळाने ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. गावासह परिसरातील बैलप्रेमींनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या समृद्धीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री गणेश मित्र मंडळाने आयोजित केलेली स्पर्धा अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी केले. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैलपोळ्यानिमित्त श्री गणेश मित्रमंडळाकडून पहिल्यांदाच आकर्षक बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, पिके ग्रुपचे प्रशांतशेठ कडू, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी दीपप्रज्वलनाने स्पर्धेला सुरुवात केली. माजी उपसभापती विष्णू चव्हाण, इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, पंकज शिंदे, कवडदरा शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गायकवाड, पिंप्रीचे उपसरपंच फिरोज शेख, दशरथ भागडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बैल सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या बैल जोडींची सजावट बघून उपस्थित मान्यवर थक्क झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान चव्हाण यांनी तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून रामदास चव्हाण यांनी काम पाहिले. यावेळी माजी उपसरपंच विनोद चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शांताराम चव्हाण, दत्तु आडोळे, दत्ता चव्हाण, लालु चव्हाण, दत्तात्रय चव्हाण आदी हजर होते.

बैल सजावट स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. बैलजोडी स्पर्धेत पहिला क्रमांक गजानन भोर, दुसरा क्रमांक पहिलवान गोटीराम चव्हाण, तिसरा क्रमांक अनिल तुकाराम चव्हाण यांच्या बैलजोडीने पटकावला. सिंगल बैल सजावट स्पर्धेत पहिला क्रमांक काळू आडोळे, दुसरा क्रमांक ओंकार रामदास चव्हाण, तिसरा क्रमांक सागर तानाजी चव्हाण यांच्या बैलाने पटकावला. अनेकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण, उपाध्यक्ष  मिनीनाथ चव्हाण, पांडुरंग चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, तुकाराम चव्हाण, श्रावण चव्हाण, काळू चव्हाण, शंकर चव्हाण, सोपान चव्हाण, सोमनाथ चव्हाण, बाळू आडोळे, हनुमान चव्हाण,  विनायक चव्हाण, अनिल चव्हाण,  दत्ता चव्हाण, रमण चव्हाण यांनी परिश्रम घेतले. पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्यामुळे या स्पर्धेचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी स्वागत केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!