विठ्ठल मंदिरासाठी ५ लाखांचा निधी देण्याची आमदारांची ग्वाही : विठ्ठल मंदिरात आमदार खोसकरांकडून महापूजा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

पंढरपूरच्या चंद्रभागेतीरावरील विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथे दारणा नदीतीरी असे विठ्ठल रुख्मिणी मंदिर प्रसिद्ध आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर याच्या हस्ते विधीवत महाअभिषेक, महापुजा आणि महाआरती करण्यात आली. पांडुरंगाच्या चरणी आमदारांनी देश कोरोनोमुक्त होवो, बळीराजाला चांगले दिवस येवो, चांगला आणि मुबलक पाऊस पडू दे अशी प्रार्थना केली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही विधिवत पूजन करून दर्शन घेतले.

आज आषाढी एकादशीनिमित्त ह्या मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोरोना संसर्गामुळे पंढरपूर येथे जाऊ न शकलेल्या वारकऱ्यांनी नियम पाळून माणिकखांब येथील मंदिरात दर्शन घेतले. भारत कोरोनामुक्त होण्यासाठी विठ्ठल रखुमाईला वारकऱ्यांनी साकडे घातले.

माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, बाजार समिती संचालक तुकाराम वारघडे, माजी उपसरपंच कमलाकर नाठे, संजय कोकणे, ॲड. एन. पी. चव्हाण, ॲड. जी. पी. चव्हाण, छाया चव्हाण, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, माजी उपसरपंच विनोद चव्हाण चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दत्ता चव्हाण, स्वाती चव्हाण, सिता चव्हाण, राणु चव्हाण, निवृत्ती ह. चव्हाण, बन्सी बाबा चव्हाण, चंदर भटाटे आदींसह  ग्रामस्थ आणि भजनी मंडळ उपस्थित होते.

माणिकखांब येथील चव्हाण परिवाराने भाविकांसाठी साक्षात पंढरीचा पांडुरंग दारणातीरी आणला आहे. ह्या मंदिर सुशोभीकरण कामासाठी मी ५ लाखांचा निधी देणार आहे. यानिमित्ताने भाविकांना नयनरम्य वातावरण आणि भक्तिमय दर्शन होऊ शकेल. 
- हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर