लग्नपत्रिका वाटायला गेलेल्या युवकाचा निर्घृण खून ? ; माणिकखांबचा नवरदेव गजानन चव्हाणवर काळाचा घाला

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

गोंदेदुमाला । पुढारी प्रतिनिधी
स्वतःच्या सोमवारी 3 मे ला होणाऱ्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटायला गेलेल्या 28 वर्षीय युवकाचा शेणवड बुद्रुक पाटीलवाडी पाझर तलाव भागात मृतदेह आढळून आला. आज सकाळी उघडकीस आलेल्या ह्या घटनेमुळे माणिकखांब भागात दुःखाचे सावट पसरले आहे. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने ह्या युवकाचा अज्ञात कारणावरून हा निर्घृण खून झाला. घोटी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कु. गजानन हरिश्चंद्र चव्हाण असे युवकाचे नाव असून सोमवारी त्याचे लग्न होणार होते. ह्या घटनेबाबत कोणाला काहीही माहिती असल्यास घोटी पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माणिकखांब ता. इगतपुरी येथील कु. गजानन हरिश्चंद्र चव्हाण हा युवक अतिशय मनमिळाऊ आणि प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध आहे. उद्या त्याचा विवाह सोहळा असल्याने त्याने शुक्रवारी रात्री आईवडिलांना सांगून शेणवड बुद्रुक खडकवाडी भागात निमंत्रण पत्रिका देऊन येतो असे सांगितले. मात्र फार उशीर झाल्याने त्याचे कुटुंबीय हवालदिल झाले. मात्र सकाळी तरी येईल या आशेने ते वाट पाहत होते. शेणवड बुद्रुक पाटीलवाडी भागात पाझर तलाव भागात त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याची माहिती घोटी पोलिसांना ग्रामस्थांनी कळवली. घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. अज्ञात खुनी व्यक्तींना तातडीने शोधावे यासाठी युवकाचे नातेवाईक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. घोटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक आर. डी. कुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी घटनास्थळी भेट दिली. ह्या प्रकरणी कोणाला काहीही माहीत असल्यास तात्काळ घोटी पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांचे नाव गुप्त ठेवले जाईल. दरम्यान ह्या प्रकरणी घोटी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आल्याचे समजते. गजानन चव्हाण ह्याच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने माणिकखांब ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.