वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
आषाढी एकादशी निमित्ताने घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी जंगलात २ किलोमीटर पायपीट केली. गिर्यारोहकांनी रस्त्यात पाण्याने ओसंडून वाहत असलेले तीन मोठे नाले ओलांडले. कोरोना महामारीत शासकीय योजनांपासून उपेक्षित असलेल्या इगतपुरी तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या खैरेवाडीत गेले. विठूरायाच्या पेहेराव्यात असलेल्या पुरुषोत्तम बोराडे या गिर्यारोहकाच्या हस्ते खैरेवाडीतील आदिवासी भगिनींना साडी, लुगडी व फराळाचे वाटप करण्यात आले. बालगोपालांना खाऊचे वाटप करण्यात आले. गिर्यारोहकांनी टाळ मृदुगांच्या गजरात विठोबारायांच्या नामाचा जागर केला.
या भक्तिमय वातावरणात विठोबाराय साक्षात दर्शन देऊन आदिवासी बांधवांच्या मदतीला आल्याचा आभास आदिवासी भगिनी, बांधवांना झाला. कु. साक्षी आरोटे हिने भक्तिगीते गाऊन प्रसन्नमय वातावरण निर्माण केले. धार्मिक सेवाभावी संस्थानी, राजकीय पक्षांनी व इतर मंडळानी कोविड काळात असे मदतीचे कार्यक्रम राबवावे असा संदेश समाजाला देण्यासाठी व गरजू लोकांना मदत करून कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी जनजागृती केली. अनोख्या पद्धतीने देवशयनी आषाढी एकादशी अतिशय दुर्गम भागात उत्साहात साजरी केली.
या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, पुरुषोत्तम बोराडे, अशोक हेमके, सुरेश चव्हाण, श्याम आदमाने, डॉ. महेंद्र आडोळे, काळू भोर, जनार्दन दुभाषे, शिवाजी फटांगरे, इंजि. दिप्तेश कुमट, मयूर मराडे, गोकुळ चव्हाण, नितीन भागवत व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.