
इगतपुरीनामा न्यूज – समाजात माणसाबद्धल संवेदनाहीनता मोठ्या प्रमाणावर वाढत असतांना प्राण्यांबद्धल असंवेदनशीलता वाढली असल्यास नवल वाटणार नाही. त्यातल्या त्यात भटक्या प्राण्यांचे हाल तर विचारूच नका. भटक्या प्राण्यांची काळजी, आजारपण याबाबत करुणा उत्पन्न होणारे लोकं दुर्मिळ आहेत. अशा बिकट काळात करुणा आणि समर्पणाचे जिवंत उदाहरण इगतपुरीच्या जीव आश्रय ॲनिमल वेल्फेअर शेल्टर या संस्थेने घालून दिले. इगतपुरीच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका भटक्या कुत्रीला पुनर्जन्म आणि कायमचा आश्रय देण्याचे जिवंत हृदयस्पर्शी उदाहरण ह्या संस्थेने घालून दिले आहे. मागील आठवड्यात जीव आश्रय संस्थेला ह्या भटक्या कुत्रीला प्रचंड वेदना होत असल्याबाबत जागरूक व्यक्तींनी माहिती दिली. शेल्टरच्या संस्थापक साक्षी दुबे यांनी तात्काळ सहा वर्षाच्या कुत्रीला ताब्यात घेऊन अत्यावश्यक उपचार करण्याचा निर्णय घेतल्याने तिला जगण्याची दुसरी संधी लाभली. ह्या सहा वर्षाच्या कुत्रीचे नाव वॉटरमिलन ठेवण्यात आले. सुरुवातीला वॉटरमिलन गरोदर असल्याचे वाटत होते. मात्र तिला दुर्मिळ असणारा जलोदर नावाचा आजार झाल्याचे निदान करण्यात आले. जलोदरने त्रस्त झाल्यामुळे तिच्या पोटात ६ ते ७ लिटर पाणी साचून वॉटरमिलन प्रचंड वेदना आणि दुःख अनुभवत होती. साक्षी दुबे यांनी त्वरित लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ज्ञानेश्वरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कुत्रीवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली. शेल्टर टीमचे अथक प्रयत्न आणि अनेक दात्यांच्या दयाळूपणामुळे वॉटरमिलनला दररोज उपचार, औषधे, आणि संस्थेचे प्रेम मिळत आहे. यामुळे वॉटरमिलनची तब्येत आता चांगली होण्याच्या मार्गावर असून जीव आश्रय ॲनिमल वेल्फेअर शेल्टरमध्ये तिचा कायमचा रहिवास असणार आहे. शेल्टर मध्ये अजून ४५ भटक्या प्राण्यांची काळजी घेतली जातेय. संस्थेचे नि:स्वार्थी कार्य, दयाळूपणा आणि औदार्य यामुळे प्राण्यांच्या जीवाची चिंता मिटली आहे. या कामासाठी यश पंचारिया, तुषार अंदाडे, धैर्य पटेल, सुरेश डावखर, अतिश दोंदे, प्रविण रोकडे यांनी जीव आश्रय संस्थेच्या कार्यात महत्वाचे सहकार्य केले. जीव आश्रय ॲनिमल वेल्फेअर शेल्टर हे मुक्या जीवांची काळजी घेत असले तरी त्यांना सामाजिक सहकार्याची अत्यावश्यकता आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यात आपण विविध प्रकारे योगदान देऊ शकतो. वॉटरमिलन कुत्रीच्या माध्यमातून संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचे इगतपुरी परिसरात कौतुक केले जातेय.