कसारा रेल्वेसह महामार्गांवरील घाटात दरडीचा पाऊस ; आपत्ती व्यवस्थापन, पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य

वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री ११ वाजता मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. महाकाय दगडी व मातीचा मलबा रस्त्यावर आल्याचे समजताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केशव नाईक व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीम या समाजिक संस्थेचे सद्यस्य शाम धुमाळ, मनोज मोरे, अक्षय राठोड, विनोद आयरे, दत्ता वाताडे, महामार्ग सुरक्षा पोलीस घोटी केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून रस्यावरील एक लेन सुरु करण्यासाठी लहान दगडी बाजूला करून एक लेन संथ गतीने सुरु केली. कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी केशव नाईक व महामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी अमोल वालझाडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनी यांच्याशी मदतीसाठी संपर्क केला. तब्बल दोन तासानंतर संबंधितानी जेसीबी घटनास्थळी पाठवला. दरम्यान रात्री ११ ते १ या वेळात भर पावसात पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी
नाशिककडे जाणारी वाहतूक विशेषतः लहान वाहनांची वाहतूक बॅटऱ्याच्या ( टॉर्च ) साहाय्याने एक लेन संथ गतीने सुरु ठेवली. रात्री २ वाजेच्या दरम्यान संबंधित पिंक इन्फ्रा  कंपनीचे कामगार आल्यानंतर मध्यरात्री २:४५ वाजता जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्यात आली. यानंतर सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर नाशिक मुंबई लेन वरील नवीन कसारा घाटातही काही झाडे व माती रस्त्यावर आली तीही बाजुला करण्यात आली.

दैव बलवत्तर.....दरम्यान रविवार असल्याने कसारा मुंबई नाशिक महामार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जेव्हा घाटात महाकाय दरड कोसळली त्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक लहान वाहने घाटाखाली थांबून होते. जर पावसाचा जोर नसता अन लहान वाहने सुरु असती तर ह्या महाकाय दरडी खाली एखादे वाहन सहज दडपले गेले असते...पण केवळ दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.

रेल्वे मार्गावरही झाड व दरड कोसळली

रविवारी रात्रीपासून ते सोमवार सकाळ पर्यंत मुंबई नाशिक महामार्गांवर दरडी कोसळत असतानाच आज सकाळी मध्य रेल्वेच्या कसारा इगतपुरी रेल्वे मार्गांवर सकाळी ६ वाजता किलो मिटर क्रमांक १२२/३८ वर महाकाय दरडी, झाडे, व मातीचा मलबा रेल्वे ट्रॅकवर कोसळला. घटनेची माहिती समजताच रेल्वेची आपत्कालीन सहायता टीम, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत रेल्वे रुळावर पडलेले झाड व दरड बाजुला करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले. या दुर्घटनेमुळे अप व डाउन मार्गाची रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. सर्व प्रकारच्या मेल व एक्सप्रेस गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. भर पावसात दरड हटविण्याचे काम युध्द पातळीवर काम सुरू असल्याने डाउन मार्गाच्या गाड्या  उशिराने धावत होत्या. या घटनेमुळे डाउन मार्गाच्या गाड्या मिडल मार्गावरून वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!