‘शिक्षणातूनच मिळेल महिलांना आत्मविश्वास’ : आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला विश्वास

इगतपुरीनामा न्यूज – ‘प्रत्येक महिलेमध्ये प्रचंड ऊर्जा सामावलेली असते. ही ऊर्जा परिस्थितीनुरूप बाहेर पडते. ही ऊर्जा शिक्षणासाठी महिलांनी वापरली तर या शिक्षणातूनच महिलांना आत्मविश्वास मिळेल’, याकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधले. सत्यजीत तांबे यांनी राजकारणापलिकडे कायम विचार करत ‘गेट इन्स्पायर्ड’ ही मालिका सुरू केली आहे. या मालिकेच्या सहाव्या भागात अहमदनगर येथील भारती भगत आणि संगमनेरचे नगरसेवक पद दोनदा भूषवलेल्या प्रमिला अभंग यांच्याशी तांबे यांनी नुकतीच बातचीत केली. या गप्पांमधून दोघींनी शिक्षणासाठी केलेला संघर्षपट उलगडत गेला. या दोन्ही महिलांच्या जिद्दीला आमदार सत्यजीत तांबे यांनी गेट इन्सपायर्ड या मालिकेच्या माध्यमातून सलाम केला आहे. या इंटरनेटवरील मुलाखतीत तांबे यांनी महिलांनी राजकीय साक्षर व्हावे आणि त्याचबरोबर आर्थिक साक्षरही व्हावे असे सांगितले. शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढून निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते याकडेही तांबे यांनी लक्ष वेधले.

यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या भारती भगत यांना तांबे यांनी बोलते केले. भारतीताई म्हणाल्या, ‘सातवी उत्तीर्ण झाल्यावर माझे लग्न लावून देण्यात आले. पुढे मुले झाली. त्यांचे संगोपन करण्यात मी रमून गेले. आपण दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे ही भावना मनाला व्यापून टाकत होती.’ शिक्षणाचे महत्त्व भारतीताईंना माहिती होते. हे महत्त्व प्रमिलाताईंना सुरुवातीला फारसे वाटत नव्हते. त्या सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्यांचा विवाह झाला. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढे शिकवता आले नाही ही खंत प्रमिलाताईंच्या आईच्या मनात होती. क्रमिक शिक्षणाकडे मुलीला नेता आले नाही याची भरपाई त्या माऊलीने प्रमिलाताईंना शिवण शिकण्याच्या वर्गात घालून केली होती. प्रमिलाताईंना त्यांच्या आईने शिलाई मशीनही घेऊन दिले आणि स्वतःच्या पायांवर उभी राहा असे सांगितले. संसार सांभाळत असताना एक दिवस त्या टीव्ही पहात होत्या. त्यावेळी टीव्हीवर आमदार सत्यजीत तांबे यांचे विचार ऐकले आणि त्यांच्या मनात पुढे शिकण्याचा विचार येऊ लागला. प्रमिलाताईंच्या पतीची त्यांना यामध्ये पूर्ण साथ लाभली. त्यांच्या प्रभागातील नगरसेवक पद महिलांसाठी राखीव झाले आणि मग यजमानांच्या जागेवर प्रमिलाताईंना तिकीट मिळाले. त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या.

शिक्षणामुळे आत्मविश्वास मिळतो या तांबे यांच्या विधानाला भारती भगत यांनीही पुष्टी दिली. त्या म्हणाल्या, ‘मी रात्रशाळेत जाऊन शिक्षण पूर्ण केले आहे. मला वयानुसार सातवीनंतर एसएससी बोर्डाचा १७ क्रमांकाचा अर्ज भरून थेट दहावी देता आली असती. परंतु मला क्रमिक शिक्षण पूर्ण करायचे असल्यामुळे मी सातवीनंतर प्रत्येक इयत्ता उत्तीर्ण होत दहावीपर्यंत गेले. घरातील सर्व कामे, लग्नकार्ये करून वेळ काढून मी अभ्यास केला. यासाठी यजमानांची पूर्ण साथ मिळाली. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी माझी मुलगी बाळंतपणासाठी घरी आलेली होती. तिचे बाळ रात्रभर खूप रडत असे. त्याला थोडी झोप लागली की मी अभ्यासाला बसे. मग हळूहळू मुलीने माझ्याकडून वाचनाच्या सरावाबरोबरच लेखन सरावही करून घेतला. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवताना खूप ताण आला होता. परंतु मनात जिद्द होती, त्यामुळेच मी दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकले.’ माजी नगरसेविका प्रमिला अभंग म्हणाल्या की, नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर मला बैठकांना जायची भीती वाटे. तिथे गेल्यावर मला काहीच कळत नसे. शासकीय अधिकारी जे सांगत त्यातील खाचाखोचा समजून येत नसत. ही स्थिती दूर व्हावी यासाठी मी शिकले आणि एमए पर्यंत गेले. यासाठी पतीची मला सतत साथ लाभली. भारती भगत यांनी सांगितले की, मी सातवी झाल्यानंतर केलेले मतदान आणि आता यंदा दहावी झाल्यावर आगामी निवडणुकीत करणार असलेले मतदान यात नक्कीच फरक पडेल. यावेळेचे मतदान मी अधिक विचारपूर्वक करेन.

Similar Posts

error: Content is protected !!