इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या खावटी योजनेच्या लाभाच्या निर्णयानुसार आदिवासी समाजातील विधवा, अनाथ, दिव्यांग,भूमिहीन, वनपट्टे धारक, रोजगार हमी योजनेवर मजूर म्हणून काम केलेले ह्या निकषात बसणाऱ्या लाभार्थींचा आदिवासी विकास विभागाने गावोगावी सर्व्हे केला. यानंतर पात्र लाभार्थ्यांचे कागदपत्र व फॉर्म भरून याद्या तयार करण्यात आल्या. अखेर गेल्या २ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेली योजना प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहचली.त्यानुसार खडकेद ता. इगतपुरी येथे माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे आदी मान्यवरांच्या हस्ते खावटी किट वाटप करण्यात आले
मध्यंतरी सर्वच आदिवासी आमदारांनी एकत्र येत आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या किट पुरविण्याच्या व किट मधील वस्तूंच्या बाजारभाव याविषयी शंका उपस्थित करून तक्रारी केल्या होत्या. वेगवेगळे टप्पे पार पाडत अखेर योजना थेट लाभार्थींपर्यंत पोहचली. दोन हजार रुपये लाभार्थींच्या बँक खात्यात तर दोन हजार रुपयांचा जीवनावश्यक वस्तूंच्या रुपात किराणा बाजार असे लाभाचे स्वरूप आहे. खडकेद येथील आदिवासी विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक आश्रमशाळेत इंदोरे, खडकेद, आंबेवाडी, कुरुंगवाडी, मांजरगाव व परिसरातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवराम झोले हे होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य केरु खतेले, खडकेदच्या सरपंच वनिता अरुण खतेले, उपसरपंच जयराम भांडकोळी, इंदोरेचे सरपंच जनार्दन शेने, उपसरपंच नथु पिचड, आंबेवाडीचे सरपंच रामदास केकरे, सामाजिक कार्यकर्ते अरुण खतेले, दत्तू भांगरे, मुख्याध्यापक पाटील सर व शिक्षक कर्मचारी वर्ग आदींसह बहुसंख्येने आदिवासी लाभार्थी उपस्थित होते.
किरकोळ त्रुटींमुळे अनेक लाभार्थ्यांना पात्र यादीतून वगळले असल्याने पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यांच्या पूर्तता करून त्यांनाही लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करू असे हरिदास लोहकरे यांनी सांगितले. पूर्वीप्रमाणे निकष न लावता गरजु व दारिद्र्य रेषेखालील त्याच प्रमाणे प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना योजनेचा लाभ मिळावा असेही ते म्हणाले. माजी आमदार शिवराम झोले यांनी आदिवासी विकासमंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करून पूर्वीप्रमाणे गरजू व पात्र सर्वच आदिवासी लाभार्थींना खावटीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. भाजप सरकारच्या काळात बंद झालेली खावटी योजना महाविकास आघाडी सरकारने सुरू करून गोरगरीब आदिवासी समाजाला मदतीचा हात दिला असल्याचेही माजी आमदार झोले म्हणाले.