रविवार विशेष : कोरोनानंतरची शाळा आणि मुलांची मानसिकता

लेखक : श्री. काकासाहेब वाळुंजकर
निवृत्त प्राचार्य तथा विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था

मुक्त जीवन शैली आणि वेगवेगळ्या प्रकारचे होणारे रोगांचे आक्रमण यामुळे मानसिक विकार व शारीरिक आजारात भर पडत चाललेली आहे. विशेषतः कोरोनात किशोरवयीन मुले या आजारांना विशेष बळी पडताना दिसत आहेत. मानसिक विकार ,व्यसनाधीनता ,लैंगिक समस्या हिंसा द्वेष यांचाही समावेश होताना दिसतो आहे.

आज प्रत्येक घराघरात बसून राहिलेली मुले आणि आणि पालकांच्या अतिरिक्त अपेक्षा वाढताना दिसत आहेत. असा मानसिक कोंडमारा व बाहेर कोरोना आणि घरामध्ये एक प्रकारचं ताण तणावाचं वातावरण यात मुलांना खेळता येईना ना शाळेत जाता येईना. बिगर बेडीचा अटकाव !

मुलांमध्ये निराशा वैफल्यची भावना निर्माण होताना दिसते आहे. आज त्यांना खऱ्या अर्थाने शाळेत विद्यार्थ्यांसोबत मित्र व शिक्षकांच्या बरोबर मुक्तपणे राहण्याशिवाय पर्याय नाही परंतु या सध्याच्या वातावरणामध्ये मुलांच्या मानसिकतेचा विचार आपण पालक व व्यवस्था करण्यास तयार नाही त्यांची सुरक्षितता फार महत्त्वाची तर आहेच पण त्यांना मानसिक बळ देणे आवश्यक आहे.

मुलांमध्ये किरकिर चिडचिड भांडणे आक्रमकता द्वेष मत्सर अशा प्रकारची वृत्ती व हिंसक प्रवृत्ती वाढताना दिसते आहे.

त्यांना मुक्त शालेय वातावरणात जाऊ देण्याची आज गरज आहे. जरी उद्या शाळा सुरू झाल्या तरी मुलांच्या मनामध्ये एक न्यूनगंड आणि भीतीची भावना निर्माण झालेली आहे अनेक मुलांनी आपल्या पालकांसमवेत बराच काळ घालवल्यामुळे त्यांच्यामध्ये एक दमनभय निर्माण झाले आहे. शालेय वातावरण हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार पोषक असणे गरजेचे आहे मुले शाळेत आल्यानंतर त्यांना समजावून घेणे त्यांच्या भावना ओळखणे त्यांची बाल मानसिकता याविषयी सकारात्मकता निर्माण करून त्यांच्या मनातील कोरोनाची भीती हळूहळू घालवणे महत्त्वाचे आहे ते काम शिक्षकाला करावे लागेल.


शाळेत आल्या आल्या लगेच अभ्यासाला गुंतवणे त्याच्या माथी अभ्यासाचं ओझं टाकणे सध्यातरी ठीक दिसत नाही शिक्षक व शाळेनेच त्या मुलांना समजावून घेणे त्यांना शालेय वातावरणात रमवणे यासाठी अनेक प्रकारचे मानसिक खेळ सुरक्षित अंतरासह क्रीडा सप्ताह, वर्गामध्ये मनोरंजक खेळ सांस्कृतिक कार्यक्रम त्याच बरोबर ज्यामधून त्यांना मुक्त होता येईल अशा प्रकारचे खेळ शिक्षकांकडून शाळांकडून होणे गरजेचे आहे.

सध्यातरी मुले ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेली आहेत शिक्षकही सध्या त्या मानसिकतेतून बाहेर येऊ इच्छित आहेत पालकांना ही वाटते की शाळा लवकर सुरू व्हाव्यात. एकूणच मुलांचे भविष्य घडविणे आपल्याच हाती आहे. आज पर्यंत कोणताही ज्योतिषी वा भविष्यवेत्ता वर्तवू शकला नाही की कोरोना कधी जाणार अशी तारीख सांगितलेले नाही.

आज अशा मानसिकतेत शाळा बंद ठेवणे म्हणजे शिक्षणव्यवस्थेला टाळेबंदी ठेवणे आहे.तरीही सुरक्षितता महत्त्वाची आहेच !

मुलांच्या मनात खेळ ही स्थायी भावना असते खेळांमागील प्रेरणा व प्रवृत्ती मुलांना शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी व शालेय वातावरणात मुले पुन्हा रमावीत यासाठी शालेय स्तरावर किमान पहिला आठवडा तरी काही मनोरंजक बाबी मुलांच्या समोर ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे त्याची ऊर्जा रिफ्रेश होईल ते शिकते होतील. असे खेळ की मुलांना हलके करतील तणाव फ्री होतील.


आपल्याला काय करता येईल?

मनोविश्लेषणात्मक व बौद्धिक कसौट्या, कोडी, लपाछपी धपाधपी कॅरम वगैरे खेळ घेता येतील.अशा खेळातून मुलांच्या भावविश्वाचे प्रकटीकरण होते.

मुलांच्या रचनात्मक व विधायक प्रवृत्तीसाठी रचनात्मक व निर्मितीक्षम खेळांची अपेक्षा आहे.यातून मुलांची विधायकता व जिज्ञासू वृत्ती वाढीस लागेल.
ड्रॉइंग पेंटिंग मातकाम विणकाम रंगकाम कला चित्रे अशा उपक्रमात गुंतवता येतील.

मुलांची चौकस बुद्धी वाढावी त्यांच्यातील औत्सुक्याला योग्य वाट मिळावी यासाठी पृथक्करणात्मक वृत्ती वाढविणारे खेळ घेतले गेले पाहिजेत. वस्तूची उकल करून पाहण्याची सवय लावणे त्याचे पृथक्करण करण्याची मुलांमध्ये असलेली प्रवृत्ती खेळांमधून वाढताना आढळते. असे खेळही घेता येतील.

अनेक मुलं सध्या तणावाखाली दिसताना आढळतात त्यांच्यातील मुक्त संचार करण्याची अंतःप्रेरणा दबल्या गेल्यासारखी झाली आहे यातून विध्वंस व द्वेषाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होण्याअगोदर त्यांना काही आध्यात्मिक वृत्ती जागवणारे खेळ तसेच काही चांगल्या पौराणिक कथा विनोदी कथा रहस्यकथा त्याचबरोबर मुलांना आवडणाऱ्या बालकथा चांगली गाणी ऐकवणे म्हणजे शिकवणे असे होऊ शकते काही धार्मिक कथा व आध्यात्मिक भावना जोपासण्यासाठी योगासने ही घेता येतील.

प्राचीन भारतीय पौराणिक व ऐतिहासिक इतिहासाचा वारसा मुलांना अवगत करून देणे शिवरायांच्या शौर्य कथा सांगणे गांधीजी सानेगुरुजी विवेकानंद फुले शाहू आंबेडकर कर्मवीर यांच्या जीवनावरील प्रसंग माहिती करून देणे ही शक्य होईल.

शालेय स्तरावर चांगल्या व संस्कारक्षम अशा कथा धार्मिक कथा यांचे वाचन किंवा कथन घर केले तर मुलांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार निश्चित होतील. तो इतिहास या निमित्ताने जाग्या येईल.

पुनरावर्तन थेरी मुलांना खेळांतून मानवाच्या वांशिक इतिहासाची पुनरावृत्ती करून देता येईल. हा पुनरावर्तन सिद्धांत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जी. एस्. हॉलने प्रथम मांडला. बालकाच्या विकसनशील अवस्थांमध्ये क्रमाक्रमाने, अजाणताच, मानवाच्या आदिम काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या सांस्कृतिक प्रगतीच्या वेगवेगळ्या अवस्थांतरांचे प्रतिबिंब त्याच्या खेळांतून पाहावयास मिळते.तोच धागा आपण विणला तर पुढील वस्त्राचा ताणाबाणा गुंफला जाईल. मुलांना पुन्हा शिक्षण प्रक्रियेत सक्रीय करणे असे होईल
मुलांनी मुलांशी खेळावे असे खेळ शर्यती, मोकाट-दौडधाव , पळणे, चालणे, रांगणे, लंगडणे, उड्या मारणे आरडाओरडा करणे यात मुक्त संचार व हालचाली होतात. संगीतखुर्ची,चमचा-लिंबू , गाढवाला शेपूट लावणे एका काडीने काड्यापेटी ठेवले तीन पायाची शर्यत आंधळी कोशिंबीर फिरत्या टायर मधून चेंडू टाकणे असे मनोरंजनपर खेळांच्या सामुदायिक स्पर्धा सुरक्षितपणे घेता येतील तसेच मुलींसाठी दोरीवरच्या उड्यां लंगडी लगोरी फुगडी आष्टोप सारख्या खेळांत रमवता येईल.

एकाने सर्वांबरोबर खेळावयाचे खेळ हे खेळ पण मुलांना फार आवडतात यांत शिवाणा पाणी, लपाछपी मामाचे पत्र हरवले आंधळी कोशिंबीर, छप्पापाणी, धबाधबी इ. खेळांचा समावेश होतो.
एकाने एकाशी खेळावयाचे खेळ द्वंद्वयुद्ध कुस्ती मुष्टियुद्ध, कमरओढ, रेटारेटी अशा अनेक प्रकारच्या लढती या गटात मोडतात तसेच बुद्धिबळासारखे बौद्धिक कौशल्यावर आधारित खेळही यात येतात. या निमित्ताने क्रीडा विश्व मुलांच्या हाती येईल.
सांघिक खेळ खेळणे पण हे खेळ जरा जपून काळजीपूर्वक खेळावे लागतील.


यात शर्यतींचा समावेश होतो. तीन पायांच्या शर्यती, पळण्याच्या गट-शर्यती,रिले-रेस, तसेच लंगडी कबड्डी, खोखो हे नियमबद्ध सांघिक खेळ.मुलांना नेहमीच आवडतात वाकड्यातिकड्या उड्या, धरपकडीचे खेळ तसेच विनोदी हालचालींचे खेळ, गोष्टीरूप खेळ असे रंजनाबरोबरच मानसिक व बौद्धिक शिक्षण देणारेही खेळ मुलांना नेहमीच आवडतात.

मुलांच्या शर्यती लावता येतील. समान क्रमांकांच्या खेळाडूने त्याला दिलेले अंतर कशा प्रकारे-म्हणजे पळून, चालून, उड्या मारून, लंगडून, रांगून, दोरीवरच्या उड्या मारून, कोलांट्या उड्या मारून वा चेंडू हाताने थापटून टप्पे पाडत अंतर कापून जायचे या नि अशा खेळात दमायचे असे झाले पाहिजे.
खास मुलींसाठी खेळ व्यायाम व करमुणकीबरोबरच भावी आयुष्यात उपयुक्त ठरतील, अशा गुणांची जोपासना या खेळांमुळे होऊ शकते फुगडी, झिम्मा, कोंबडा, पिंगा, ‘किकीचे पान बाई किकी’, ‘किसबाई किस’ हे मुलींचे काही खेळ खेळता येतील.

मनोरंजक साभिनय खेळ यात मनोरंजक गोष्टी सांगणे ती सांगताना प्रसंगानुसार हावभाव करायचे असतात किंवा अभिनयासह गीत गायचे असते.
सांघिक मैदानी खेळ आहेतच.
परदेशी खेळात क्रिकेट ,रिंग टेनिस,टेबल-टेनिस इ. व मुली नेटबॉलसारख्या खेळांचा सराव करू शकतात. पाश्चात्त्य देशांत हे खेळ तसेच व्यायामी खेळ बालवयातच शिकविले जातात.
बैठे खेळ यात पत्ते व पत्त्यांचे खेळ, कॅरम, पटावरील खेळ, व्यापार, बुद्धिबळ इ. खेळ मुले फावल्या वेळात व सुटीत खेळतात.मुले खेळली की शिकतात अनुभव व निर्णय या खेळातूनच ती शिकत असतात.

सामुदायिक कवायतीच्या खेळातून मुलांना शिस्त व स्वच्छता यांचे महत्त्व पटते. कवायत व खेळ यांची हल्ली सांगड घालण्यात आलेली आहे. क्रिकेटसारख्या खेळात फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांना ज्या हालचाली कराव्या लागतात, आनंद मिळविणे हेच बालकांची इच्छा असते; त्या दृष्टीने खेळ हे साधनरूप असतात. तसेच जीवनात पुढे कराव्या लागणाऱ्या आवश्यक शारीरिक कृतींची रंगीत तालीमच खेळामध्ये घडते. आजकाल खेळांचे महत्त्व भारताताही वाढते आहे. सुदृढ भावी पिढी निर्माण करण्याचे कार्य शारीरिक शिक्षणामुळेच साध्य होऊ शकेल. असा एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे. खेळांमुळे बालकांचे शरीर सदृढ होते व मन निरोगी राहते, याचीही योग्य ती जाणीव निर्माण झालेली आहे. खेळांतून मुलांना आज्ञाधारकपणा, समता, शिस्त, खिलाडूवृत्ती, वैयक्तिक जबाबदारीची जाणीव, सांधिक भावना, सावधानता, महत्त्वाकांक्षा वगैरे गोष्टींचा लाभ होतो. हे सर्व गुण राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. खेळामुळे बालकांना नैतिक शिक्षणाचेही पाठ मिळतात व चांगला नागरिक बनण्याचे शिक्षण मिळते.
आज मुलांना पुन्हा पूर्ववत शाळेत रममाण होत अभ्यासात गुंतवायचे असेल तर सुरक्षित वातावरणात मुलांची पावले मैदानाकडे वळावीत पुन्हा त्या शाळा भराव्यात गर्दीने मैदाने फुलावीत गोंधळ गोंगाट व्हावा आणि शिक्षणाचा जागर गोंधळ पुन्हा निर्माण व्हावा. ही अनिवार ओढ व इच्छा लवकरच पूर्ण होईल ही सदिच्छा बाळगू या !

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!