इगतपुरीनामा न्यूज दि. १ : आर्थिक वर्षातल्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज घरगुती गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज तब्बल पन्नास रुपयांची वाढ झाली असून आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नियोजन अर्थात गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडणार आहे. स्वयंपाकासाठी गॅस वापरणे दिवसेंदिवस महाग होत असून यापुढे नाईलाजाने गॅसचा वापर करणे बंद करून चुलीचा वापर सुरू करायची वेळ आली आहे, अशा प्रतिक्रिया सामान्य गृहिणी व्यक्त करत आहेत.
केंद्र सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस, पेट्रोल, डिझेल अशा इंधनांचे दर घोषित केले जातात. इगतपुरी शहरातील आकडेवारीनुसार कालपर्यंत एक हजार पासष्ट रुपयांना मिळणारे घरगुती गॅस सिलिंडर आज एक हजार एकशे पंधरा रुपयांना मिळत आहे. तब्बल पन्नास रुपयांची वाढ ही आधीच इतर महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. असेच सुरू राहिले तर नाईलाजाने पुन्हा पारंपारिक इंधन वापरणे सामान्य जनतेला क्रमप्राप्त आहे. अकराशे रूपयांपेक्षा जास्त किमतीचा घरगुती सिलिंडर आजही कित्येकांच्या आवाक्याबाहेर आहे. रॉकेल सारखे पर्याय कधीच मार्केट मधून गायब झाले आहेत. त्यामुळे लाकूडफाटा जमा करण्याखेरीज ग्रामीण भागात तरी अन्य पर्याय नाही. त्यामुळे गॅसच्या वाढत्या दराचा परिणाम वृक्षसंपदेवर होणार असून नाईलाजाने का असेना पण वृक्षतोड वाढणार आहे हे निश्चित!