‘शैक्षणिक पालकत्व..एक हात मदतीचा..!’
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
कोविड आणि अन्य संकटांमुळे शिक्षण थांबलेल्या विद्यार्थिनींना मायेचा हात मिळाला आहे. आशेचा किरण बनलेल्या शिक्षिकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर झाला आहे. कुंदा बच्छाव व वैशाली भामरे ह्या शिक्षिकांच्या अविरत प्रयत्नांनी तब्बल ६० विद्यार्थिनींचे शैक्षणिक जीवन उजळणार आहे. आनंदवल्ली शाळेतील शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थिनी पुढे उच्चशिक्षण घेत नाहीत. यासह स्वावलंबी तर होत नाहीच उलट शिक्षण बंद होऊन कमी वयातच त्यांचे लग्न लावून दिले जाते. ह्या विदारक परिस्थितीमुळे आनंदवल्ली येथील मनपा शाळेच्या शिक्षिका कुंदा बच्छाव व वैशाली भामरे अतिशय व्यथित झाल्या. शिक्षण बंद होण्याची कारणे पाहता बिकट आर्थिक परिस्थिती आणि बालविवाह यामुळे विद्यार्थिनींची शिक्षणातील गळती होत असल्याचे त्यांना आढळले.
त्यानुसार त्यांनी अशा शिक्षण थांबलेल्या गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व देवून त्यांची शैक्षणिक जबाबदारी उचलण्याचे ठरवले. त्यासाठी सुरुवातीला कुंदा बच्छाव यांनी स्वतः ३, पती किरण शिंदे यांनी १, वैशाली भामरे यांनी २ विद्यार्थीनीना शिक्षणासाठी दत्तक घेतले. यासह ज्यांना शिकण्याची जिद्द आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण बंद होण्याची वेळ आली होती अशा विद्यार्थिनींना शैक्षणिक मदतीसाठी शैक्षणिक पालकत्व.. एक हात मदतीचा..!! हे अभियान सामाजिक स्तरावर मोठ्या पातळीवर राबवायचे ठरवले.
या अभियानात मनपा शिक्षक प्रशांत पाटील हे जोडले गेले. कुंदा बच्छाव यांनी सोशल मीडियाद्वारे शिक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पुजा राम लिपटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विलास शिंदे, उदय गायकवाड, किरण विधाते, आशिष जैन, सोनल पाटील, किशोर ललवाणी, रीना चौरे यांनी अनेक विद्यार्थिनींना शैक्षणिक पालकत्व दिले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक, नयना गांगुर्डे यांच्या पुढाकाराने ‘इनरव्हील क्लब जेन नेक्स्ट, नाशिक’ यांनी २० विद्यार्थ्यांची पुढील ४ वर्षासाठी शिक्षणाची जबाबदारी घेतली. रणरागिणी मराठा ग्रुप यांनीही गरजू विद्यार्थीनीना शैक्षणिक साहित्य वाटप केले. अशाप्रकारे शैक्षणिक पालकत्व या अभियानात दानशूर व्यक्ती जोडले जाऊन माणुसकीची मोठी साखळी तयार झाली आहे.
या अभियाना अंतर्गत ६० गरजू व हुशार विद्यार्थीनीना शैक्षणिक पालकत्व मिळाले आहे. कोरोनाचे नियमांचे पालन करून काही विद्यार्थीनीना प्रातिनिधिक स्वरुपात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास नाशिक मनपा शिक्षण सभापती संगीता गायकवाड, शिक्षण प्रशासनाधिकारी सुनिता धनगर, असिस्टंट चॅरिटी कमिशनर राम लिप्ते, आनंदवल्लीचे नगरसेवक तथा गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे, विजयकुमार इंगळे, आनंदवलीचे केंद्र मुख्याध्यापक कैलास ठाकरे, सुनील हांडगे, संजय काकड, विष्णु बेंडकोळी आदींसह पालक उपस्थित होते. कर्मदान फाउंडेशनच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार असून योगदान देवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन कुंदा बच्छाव, वैशाली ह्याळीज व श्री. पाटील यांनी केले आहे.
नाशिक शहरातून प्रथमच राबविले जाणारे शैक्षणिक पालकत्व या प्रशंसनीय अशा अभियानाद्वारे उच्चशिक्षित नागरीक घडविला जाणार असून त्यायोगे समाजाच्या व परिणामी भारत देशाच्या विकासास नक्कीच हातभार लागणार आहे यात शंकाच नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी समाजऋण फेडण्याची संधी असलेल्या या अभियानात नक्की सहभागी व्हावे.
- कुंदा बच्छाव शिंदे ९४२०६९५०६५
- वैशाली भामरे ह्याळीज, 7588618741