इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
सामाजिक बांधिलकी उपक्रमातून महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा, नाशिक व विविध सेवाभावी संस्था यांचे वतीने नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कन्या विद्यालय नाशिक या शतक महोत्सव पूर्ण केलेल्या ऐतिहासिक शाळेतील इयत्ता १ ली ते १० वीच्या सर्वसाधारणपणे ६०० मुलींसाठी “एक वही मोलाची सावित्रीच्या लेकीची” हे ब्रिद घेऊन विविध प्रकारच्या ६४०६ वह्या मोफत वाटप करण्यात आल्या.
कोरोना काळात नाशिक शहरातील गरीब कुटुंबातील मुली या शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांना मोफत शिक्षण उपलब्ध होत असतांना अत्यावश्यक वह्या उपलब्ध होण्यासाठी औषध निर्माण अधिकारी संघटना व विविध सेवाभावी संस्था मागील गत आठ वर्षांपासून सातत्याने मोफत शालोपयोगी वह्या शासकीय कन्या शाळेतील मुलींसाठी मोफत उपलब्ध करुन देत आहे.
शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथील मुलींना मोफत शालेय अभ्यासक्रमास आवश्यक वह्या उपलब्ध करुन देणेकामी प्रसिद्ध उद्योजक प्रदीप राठी, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी नायडू, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विजय देवरे, जिल्हाध्यक्ष फैय्याज खान, कार्याध्यक्ष हेमंत राजभोज, जनार्दन सानप, सचिन अत्रे, प्रशांत रोकडे, शिरीन मांडे, प्रेमानंद गोसावी, अमृत खैरनार व माधवी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभत आले आहे.
शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथील गोर गरीब मुलींसाठी याव्यतिरिक्त अत्यावश्यक शैक्षणिक मूलभूत सुविधा तत्पर उपलब्ध करुन देण्यासाठी औषध निर्माण अधिकारी संघटना कायम कटिबद्ध राहील अशी ग्वाही औषध निर्माण अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फैय्याज खान यांनी दिली.