लेखन - पुरुषोत्तम आवारे पाटील, पत्रकार
संवाद : 9892162248
साधारण एक तप म्हणजे 12 वर्ष मी विविध वृत्तपत्रांचा मंत्रालय रिपोर्टर म्हणून काम केले.या दरम्यान असंख्य मंत्री,राज्यमंत्री आणि आमदार यांच्या जवळून संपर्कात होतो.काही तर माझे “ग्लासमेट” पण झाले होते. दारूबंदी व व्यसनमुक्ती या खात्याचे तर मी 3 मंत्री असे पाहिले की संध्याकाळ होताच त्यांचे हात थरथर कापत असत. मग साहेब बंगल्यावर “मिटींगला”निघून जात.
कमाल अशी की त्यांची व्यसन मुक्तीवरील भाषणे ऐकून लोक मंत्रमुग्ध होत असत. सुरुवातीला मला मोठी चीड यायची. नंतर या अभिनयाचे कौतुक वाटायला लागले. थोडक्यात सब डबल गेम…पण या बजबजपुरीत एक आमदार जो बोलतो तसे वागतो याची प्रचिती अनेकदा आली, तो वऱ्हाडी माणूस होता बच्चू कडू..
बच्चूभाऊ अपक्ष आमदार असल्याने विधानसभेत फार कमी वेळ त्यांच्या वाट्याला येत होता. पण हा माणूस जिद्दी, कामासाठी लागट आहे.अनेकदा तर ते सतत हात वर करून अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय ….जिद्दी पेटायचे…बाबासाहेब कुपेकर अनेकदा बच्चू कडू आणि तुकाराम बिडकर यांना वरून ओळखण्यात गडबड करीत..दोघेही दाढीवाले आणि ढंग वऱ्हाडी.. बच्चू बोलल्यावर काहीवेळाने बिडकर यांनी हात वर केला, बोलण्याची संधी मागितली की कुपेकर वरून म्हणत असत…बच्चू कडू तुम्ही खाली बसा, कितीवेळा बोलणार ! बिडकर गुमान खाली बसून विचार करीत असत,आपण कधी बोललो बुवा ?
प्रहार पक्षाची स्थापना केल्यावर सुद्धा बच्चूभाऊ अधिवेधन काळात विधान भवन कॅन्टीनला हमखास भेटत असत. पण इतरांसारखा त्यांनी कधी पत्रकारांना कॉकटेल पार्टीचा आग्रह केला नाही,जे आपण करायचे नाही ते इतरांनाही करायला प्रवृत्त करायला नको हाच बाणा त्यांनी कायम ठेवला. व्यसने, तडजोडी, तोडपाणी या सवयी कार्यकर्ता सोबत घेऊन येत नसतो. नेत्यांकडून त्याला हे शिकायला मिळते,म्हणून नेत्याने हे कठोरपणे पाळायला हवे याची कृती बच्चूभाऊ करताना दिसतात.
अपना भिडू,
बच्चू कडू
ही चांगलीच घोषणा आहे, ती द्यायला पण हवी मात्र त्या सोबतच…
चला व्यसने सोडू
म्हणतो बच्चू कडू !
या घोषणेची सुद्धा आता गरज आहे. एका मोठ्या शहरातील संपन्न कार्यकर्ते बच्चूभाऊच्या मागेच लागले की आम्हाला तुमच्या पक्षात काम करायचे आहे. शाखा स्थापन करायची आहे, बहुतांश लोकांना काय हवे असते हे आता बच्चूभाऊला पाठ झाले आहे. 10/15 कार्यकर्त्यानी भला मोठा बुके त्यांना दिल्यावर त्यांना मंत्रालयात मिटिंग हॉलमध्ये चहापाणी झाल्यावर भाऊ म्हणाले… लोकांची कामे करा, सेवा करा, पक्षाचेही काम करा पण यासाठी मी किंवा पक्षाकडून एक रुपयांचीही अपेक्षा करू नका. तुमच्या कोणत्याही अवैध कामांना मी संरक्षण देणार नाही. खोटे काम करून पोलीस स्टेशनला गेल्यास तुमच्यासाठी फोन करणार नाही. घर की रोटी खाओ और लोगोकी बकरी चराओ …भाऊ उठले अन दुसऱ्या कामाला लागले,मोठ्या अपेक्षेने आलेल्या त्या कार्यकर्त्यामध्ये चुळबुळ सुरू झाली. अरे मग काय फायदा..?