बहुचर्चित धामडकीवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची अधिकाऱ्यांकडून सफर

अशिक्षित वाडी मात्र सुशिक्षितांच्या डोळ्यांत अंजन घालणारी शाळा पाहून लाभली धन्यता

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

पर्यटकांचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या भावली धरण परिसरात एका कोपऱ्यात काहीशी दुर्लक्षित तर काहीशी नकाशावर दिसणारी एवढी एवढी धामडकीवाडी…वाडीला निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई…मंद मंद आणि धुंद करणारा पाऊस…क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण…घनदाट वृक्षांची छाया…मुक्तहस्ते निर्मित धबधबे…हंबरत हंबरत मंजुळपणे चरणारी गायी गुरे…किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे…नुकत्याच उमलेल्या रानफुलांचा वेड लावणारा सुगंध… अशा वातावरणात आपल्या सगळ्या समस्या आणि गरिबीचे घोंगडे बाजूला ठेवून पाहुण्यांचे मुक्त मनाने स्वागत करणारे वाडीकर ग्रामस्थ. अशा आगळ्या वेगळ्या धामडकीवाडीत असणारी जिल्हा परिषदेची महाराष्ट्रभर गाजणारी “टीव्हीवरची शाळा” पाहण्यासाठी नाशिकच्या डायट संस्थेचे जेष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे यांनी आकस्मिक भेट दिली.

धामडकीवाडी हे गाव शिक्षणाच्या प्रवाहाला मुक्तहस्ते साहाय्य करणारे अशिक्षित पण शिक्षितांच्या डोळ्यांत अंजन घालणारे गाव आहे असे गौरवोद्गार योगेश सोनवणे यांनी काढले. शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधांची अडचण न सांगता आहे त्या स्थितीत नाशिक जिल्ह्यात नावाजलेली समृद्ध शाळा पाहून सार्थक झाल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. आमची शाळा, माझी शाळा, माझा अभ्यास, माझे शिक्षक आदींवर इथल्या विद्यार्थ्यांच्या चिवचिवाटाने शाळेचा परिसर गजबजून गेला होता. शेतमजुरीवर गुजराण करणाऱ्या वाडीकरांनी “मोठा सायेब वाडीत आलाय आपल्या” असं समजल्याने उत्स्फूर्तपणे साहेबांची भेट घेतली. गावकऱ्यांच्या आदरातिथ्याने अधिकारी सुद्धा भावुक झाल्याचे दिसले.

अधिकाऱ्यांच्या भेटीचे निमित्त सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी आणि तपासणी करणे हे असले तरी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीला उपयुक्त ठरलेला पॅटर्न सुद्धा संशोधक नजरेने तपासण्यात आला. वाडीतील टीव्हीवरच्या शाळेचा प्रेरणादायी उपक्रम अशिक्षित पालकांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी सेतू अभ्यासक्रमाबाबत शिक्षक व पालकांना सोशल डिस्टन्सचे योग्य पालन करून त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अपरिचित अधिकाऱ्यांपासून लांब लांब पाळणारे आदिवासी भागातील विद्यार्थी सगळीकडे दिसत असले तरी येथील विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने अधिकाऱ्यांशी हितगुज केले.

जेष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे, उपक्रमशील शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांनी शाळेचे नावाजलेले कार्य, शाळेच्या बोलक्या भिंती, सक्षम ग्रामस्थ आदींचे कौतुक करून शिक्षकांना प्रोत्साहन दिले. यावेळी मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, दत्तू निसरड उपस्थित होते. ग्रामस्थ गोकुळ आगीवले, बबन आगीवले, खेमचंद आगीवले, आशा कार्यकर्ती धोंडीबाई आगीवले, ग्रामपंचायत सदस्या चांगुणा आगीवले आदींनी याप्रसंगी हजेरी लावली.

धामडकीवाडीतील निरागस लहानशी परी शाळेच्या ओढीने आलेली असतांना अचानक रडायला लागली. तिच्यासाठी बालगीत गायल्याने ती शांत झाली. एकटकपणे योगेश सोनवणे यांच्याकडे पाहून हसू लागल्याने तिला कडेवर घेण्याचा मोह श्री. सोनवणे यांनी आवरला नाही.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!