
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भारतीय दलित साहित्य अकादमी व रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशनतर्फे सामाजिक काम करणारे राष्ट्रीय चर्मकार महासंघ पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यातील उभाडे शिवारातील श्री स्वामी समर्थ मागासवर्गीय महिला सहकारी सूतगिरणी येथे ८ व ९ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर होईल. शिबिरात अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया, अ. भा. दलित साहित्य अकादमी अध्यक्ष सोहनपाल सुमनाक्षर, राज्यसभा सदस्य सत्यनारायण जटिया, डॉ. आंबेडकर स्मारक निर्माण दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये, रचना ऑफिसर सोशल असोसिएशन अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव दांडगे, श्री स्वामी समर्थ मागासवर्गीय महिला सहकारी सूतगिरणी संस्थापक दलितमित्र अशोकराव माने, DICCI अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, संत रविदास चर्मोद्योग महामंडळ इंगळे, धम्मज्योती गजभिये या प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांतील वरिष्ठ पदाधिकारी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, कार्याध्यक्ष भानुदास विसावे व आजी माजी आमदार, खासदार उपस्थित राहणार आहे. शिबिरात सहकार तत्त्वावर चालणाऱ्या समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती, सूतगिरणीची यशोगाथा, चर्मोद्योग बजेट व चर्मकार बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती, खादी ग्रामोद्योग व मागासवर्गीय युवकांसाठी उद्योगधंद्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या संधी आणि संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या जीवनावर मार्गदर्शक माहिती मिळणार आहे. कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्त्यांच्या कामांची रूपरेषा कशी असावी याविषयी सविस्तर माहिती शिबिरामध्ये देण्यात येणार आहे. समाजातील युवक, युवती, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सचिव दत्तात्रय गोतीसे, जिल्हाध्यक्ष दिलीप गोविंद, श्रावण, सचिव अनिल कानडे यांनी केले आहे.
