इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
सध्याचा काळ एकमेकांना सोबत घेऊन कोरोनाचे युद्ध जिंकण्याचा आहे. माणसांतील माणुसकीचे दर्शन घडवून अखंड रुग्णसेवा हेच सध्याच्या काळात व्रत ठरते आहे. इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके आणि कोविड मदत ग्रुप यांचे मोठे साहाय्य होत आहे. ह्या सामाजिक कार्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सर्व प्रशासनाच्या प्रयत्नांना चांगले योगदान लाभले आहे. आगामी काळात एकजुटीने कोरोना विरुद्धचा लढा आपण सर्वजण नक्कीच जिंकू असे प्रतिपादन घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी केले. गोरखभाऊ बोडके युवा फाउंडेशन आणि कोविड मदत ग्रुपच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी १० ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर मशीनचे लोकार्पण श्री. पळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,आलेल्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी सर्वांचे साहाय्य बहुमोल ठरत असल्याने प्रशासनाला अभिमान वाटतो. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी सांगितले की, इगतपुरी तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आम्ही सदैव तत्पर असून अत्यावश्यक आरोग्य सेवेबाबत आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही निश्चितपणे सर्वांना मदत करू. कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, घोटीचे प्रभारी सरपंच रामदास भोर, कोविड मदत ग्रुपचे अँडमिन हरिश्चंद्र चव्हाण, घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते, ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, किरण फलटणकर, माजी उपसरपंच रामदास गव्हाणे, समाधान जाधव, विक्रम मुनोत, निलेश काळे आदी उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यातील कोणत्याही गरजू रूग्णाला ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन लागल्यास कोविड मदत कक्षच्या माध्यमातून विनामूल्य पुरवण्यात येणार आहे. यासाठी इगतपुरी तालुका ( ग्रामीण ) - हरिश्चंद्र चव्हाण, भास्कर सोनवणे, दीपक गायकवाड, घोटी शहर - श्रीकांत काळे, समाधान जाधव, रामदास गव्हाणे, निलेश काळे, सचिन तारगे, इगतपुरी शहर - किरण फलटणकर, वसीम सय्यद यांना संपर्क साधावा.
- हरिश्चंद्र चव्हाण, कोविड मदत ग्रुप अँडमिन