कावनई व सर्वतीर्थ टाकेदला महाशिवरात्री निमित्त यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी

इगतपुरीनामा न्यूज दि. १० :


जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी करोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री. क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी करण्यात आली असून या बाबत शासनाकडून व पोलीस प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत इगतपुरी तहसिल प्रशासन, तालुका आरोग्य विभाग व घोटी पोलिसांना याबाबत सूचना देखील करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना दोन्ही धार्मिक स्थळी येण्यास बंदी असणार आहे. त्याचप्रमाणे फराळ वाटप, पूजा विधी हे कार्यक्रम देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान प्रशासनाने व्यापारी व स्थानिक नागरिकांना आपआपली दुकाने बंद करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
दरम्यान सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कावनई येथे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी पत्र देखील संबंधित यंत्रणेला पाठवले आहे. ग्रामीण पोलीस उपअधीक्षक डॉ अर्जुन भोसले, घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सर्वतीर्थ टाकेद संस्थानचे अँड. महंत श्री किशोरदास श्रीवैष्णव, महंत फलहारी महाराज, महंत उडिया महाराज कावनईचे ट्रष्टी कुलदीप चौधरी यांनी व स्थानिक नागरिकांनी बैठक घेऊन यात्राउत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला.
कावनई व टाकेद तीर्थ क्षेत्र हे पूर्णपणे बंद असणार आहे. संचार बंदी कालावधीत तिर्थक्षेत्रावर कोणीही येणार नाही. नियम तोडून कोणी गैरवर्तन केल्यास सदर व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही देखील होइल.