व्यवसाय मार्गदर्शन भाग – २ : किराणा दुकान

मार्गदर्शक : मधुकर घायदार
संपादक शिक्षक ध्येय, नाशिक
संपर्क : 9623237135

आजकाल पदवीधर होऊनही सरकारी किंवा खासगी नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. युवकांमध्ये संवाद कौशल्य अन नवीन काहीतरी करण्याची जिद्द असेल तर किराणा मालाचे दुकान हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कुठलीही नवीन वस्ती उदयास आली की तिथे सर्वप्रथम किराणा दुकानदार आपले दुकान सुरु करतो. देशभर गल्लोगल्ली, कानाकोपऱ्यात किराणा मालाचे दुकान असतेच. घाऊक बाजारातून माल खरेदी करून त्यांची किरकोळ स्वरूपात विक्री करणे आणि त्यातून सुमारे वीस ते तीस टक्के नफा मिळविणे हेच या व्यवसायाचे गुपित. सर्वात सुरक्षित कोणता व्यवसाय असेल तर तो किराणा मालाच्या दुकानाचा. कारण माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचे हे दुकान. या व्यवसायाने देखील आता कात टाकायला सुरुवात केली आहे. मात्र या व्यवसायात देखील काही कौशल्ये अंगी हवीतच.

भरपूर लोकवस्ती असलेल्या ठिकाणी, चौकात किंवा रोडला लागून सुमारे तीनशे स्वेअरफुट गाळा ( भाडेतत्वावर ) शोधणे, त्यात लाकडी फर्निचर तयार करणे, होलसेल दुकानातून किराणा माल भरणे यासाठी साधारणत: एक ते दोन लाख भांडवलाची आवश्यकता असते. कुठलीही वस्तू उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहचेपर्यंत त्या वस्तूची किंमत तीन ते चार पट झालेली असते. याची साखळी कच्चा माल उत्पादक – मालावर प्रक्रिया करून त्याचे प्रोडक्ट्स बनविणारी कंपनी – प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर करणारी कंपनी – होलसेल विक्रेता – किरकोळ विक्रेता याप्रमाणे असते. या साखळीमध्ये एकाकडून दुसऱ्याकडे वस्तू जातांना त्या वस्तूंच्या मूळ किंमतींमध्ये विक्रेत्याचा नफा आणि सरकारी कर यांचा समावेश होतो. किराणा मालाच्या दुकानासाठी दुकानदार जितका ठोक माल घेतो तितका जास्त डिस्काऊंट त्याला मिळतो. या व्यवसायात मात्र भांडवलास अधिक महत्त्व आहे. जितके जास्त ग्राहक तितका जास्त नफा हे साधे सूत्र या व्यवसायातही तंतोतंत लागू पडते.

हल्ली मॉल संस्कृतीमुळे किराणा मालाच्या दुकानाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे असा प्रसार केला जातो. पण या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किराणा दुकानदाराने स्वतःमध्ये, व्यवसायामध्ये बदल करणे गरजेचे आहे.
किराणा दुकानदार दुकानातील माल घाऊक बाजारपेठेतून खरेदी करून त्यांची किरकोळ विक्री करतो. मात्र या व्यवसायासाठी आवश्यक आहेत संवाद कौशल्य, नवनवीन ग्राहक जोडण्याची कला, उत्कृष्ठ दर्जाचा किराणा माल व त्याची माफत किंमतीत विक्री.
किराणा मालाचे दुकान आणि ग्राहक यांचे नाते वेगळेच असते, ते फक्त दुकानदार आणि ग्राहक एवढेच मर्यादित नसते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे याचा प्रवास होत असतो. सध्या पारंपारिक पद्धतीने हा व्यवसाय न करता यात नाविन्य शोधणे आज गरजेचे झाले आहे. सोशल मिडियाद्वारे जाहिरात करणे, घरपोच किराणा माल पोहचविणे, संकेतस्थळाच्या माध्यमातून नवनवीन ग्राहक मिळवून त्यांच्यापर्यंत माफक दरात किराणा पोहचविणे, न्यूजपेपरमध्ये जाहिरात देणे, हँडबील वाटप करणे वा न्यूजपेपरमध्ये टाकणे अश्या अनेक क्लुप्त्या वापरून या व्यवसायात भरघोस नफा मिळविता येतो.
भारतात शासकीय आयटीआय तसेच अनेक खासगी संस्थेमध्ये ‘रिटेल’ हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यात प्रामुख्याने किरकोळ मालाची विक्री कौशल्ये कशी अंगीकृत करायची याचे प्रशिक्षण दिले जाते.

व्यवसाय करणे कठीण नाही फक्त आपली नकारात्मक भूमिका दूर करायला हवी. किराणा मालाच्या दुकानातून वीस ते साठ हजार रुपये महिना कमाई होऊ शकते. प्रामाणिक प्रयत्न, संवाद कौशल्य, सेवाभावी वृत्ती, दर्जेदार मालाची निवड, घरपोच अन तत्पर सेवा, कष्ट करण्याची तयारी हे कौशल्ये अंगी असेल तर या व्यवसायात भरभराट नक्कीच आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!