आश्चर्यम – एकच महिन्यात एकच कुटुंबातील ३ जण झाले वेगवेगळ्या संस्थांचे चेअरमन : इगतपुरी तालुक्यात होतेय विशेष कौतुक

इगतपुरीनामा न्यूज – राजयोग प्रबळ असेल तर हिमालयाएवढे संकट सुद्धा साध्या वावटळीसारखे होऊन जाते. ह्यापुढे कितीही लोकांनी आणि विरोधकांनी खोडा घातला तरी सत्तेची माळ मात्र गळ्यात पडल्याशिवाय रहात नाही. असा बलवान राजयोग इगतपुरी तालुक्यातील एकाच कुटुंबासाठी वरदान ठरला आहे. मागील एकाच महिन्यात ह्याच कुटुंबातील पिता आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र यांना वेगवेगळ्या संस्थांच्या चेअरमनपदावर विराजमान झाले. ही घटना अतिशय दुर्मिळ आणि ऐतिहासिक असून इगतपुरी तालुक्यात ह्याची विशेष चर्चा सुरु आहे. राजकीय क्षेत्रात भक्कमपणे सत्तेचे सिंहासन काबीज करणारे माजी आमदार शिवराम झोले यांच्या परिवारातील ही कौतुकास्पद घटना आहे.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघात दोनवेळा आमदार, २५ वर्ष आदिवासी महामंडळ संचालक आणि २ वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले शिवराम झोले हे प्रसिद्ध आहेत. इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून मागील महिन्यात त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे सुपुत्र बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले यांची खंबाळे आदिवासी सोसायटीच्या चेअरमनपदावर वर्णी लागली. यानंतर लगेचच मोगरे आदिवासी कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदाचा मान दुसरे सुपुत्र हेमंत झोले यांना लाभला. एकच महिन्यात एकच परिवारातील तिघेजण चेअरमन होतात ही विशेष घटना आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर लहाने, सुनील जाधव आदींनी झोले परिवाराच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!