इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ ( सुनिल बोडके यांच्याकडून )
हल्ली मुली जन्माला घालणे म्हणजे काही जण नाक तोंड मोडताना दिसतात. मुलगी जन्माला आली तर कशाला तो आनंद उत्सव करायचा. पण जर मुलगा जन्माला आला तर अख्या गावात पेढे वाटायचे. असे काहीसे फॅड आजही ग्रामीण, शहरी भागात काही अडाणी माणसे करत असतात. यांच्या मते मुलगा तेवढा वंशाचा दिवा असतो तर मुलगी मात्र परक्याचे धन अशा अनेक रूढी पाहायला मिळतात.
आता मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन निश्चितच बदलत आहे. ह्या विषयावर समाज प्रबोधन करण्यासाठी वेळुंजे ता. त्र्यंबकेश्वर येथील नाभिक बांधव सुरेश बाबुराव पवार यांनी मात्र आगळी शक्कल लढवली आहे. “ज्या घरात मुलगी जन्माला आली तर त्या घरातील पालकाचे तीन महिन्यां करिता केस कापण्याचे काम त्यांनी फुकट करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या ह्या नामी युक्तीचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
पवार यांनी आपण छोटे असो वा मोठे परंतु आपल्या परीने समाज परिवर्तन करू असा संकल्प केला आहे. मुलगी जन्माला आली म्हणून नाराज होऊ नका. ती नुसती मुलगी नसून आपल्या घरची लक्ष्मी आहे असे समजा. एक मुलगी जन्माला आली तर ती दोन कुटूंबाची सेवा करत असते. त्या मुलीला कमी समजू नका। असे ते मुलगी जन्माला आलेल्या प्रत्येकाला सांगत असतात. त्यांच्या प्रबोधनामुळे वेळुंजे, अंबोली, गोरठाण, अंबई परिसरात ते फारच प्रसिद्ध झाले असून त्यांच्या गर्दी वाढत आहे.
■ मुलगी ही घरची लक्ष्मी आहे. त्याचे स्वागत आनंद साजरा करूनच व्हायला हवे. जिजाऊ आई साहेब जर नसत्या तर घडले असते का स्वराज ? त्यामुळे मुलींना कमी समजूच नये असे माझे मत आहे. आपल्या रोजच्या कामातून अनेक प्रकारच्या लोकांशी संबंध येत असतो. आपले काम करता करता थोडे प्रबोधन करून समाधान वाटते. मुलगी ज्या कुटुंबात जन्मली तर त्या पालकाचे केस कापणे, दाढी करणे ही कामे तीन महिने फुकट करीत आहे.
– सुरेश बाबुराव पवार, नाभिक बांधव वेळुंजे
