इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ ( निलेश काळे यांच्याकडून )
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या अधरवड येथे काल सोमवार ( दि. ८ ) रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. मेन लाईनमुळे आग लागून शेतात लावलेले कलमी आंब्याचे १००, जांभळीचे १५०, व कडू लिंबाची २५ झाडे जळून आगीत भस्मसात झाले. जनावरांसाठी रचून ठेवलेले गवत व पेंढे देखील आगीच्या भक्षस्थानी सापडले.
विशेष म्हणजे शेतकरी मोहन बऱ्हे यांनी उपअभियंता महावितरण कंपनी यांना १६ नोव्हेंबर २०११ रोजी निवेदन दिले होते. शेतीसाठी व शेतजमीन सपाटीकरणासाठी अडथळा येत असल्याने टाकेदसाठी गेलेली मेन लाईन बाजूला हलवून रस्त्याच्या कडेने टाकण्यासाठी विनंती त्यामध्ये केली होती. त्याचप्रमाणे २२ ऑगस्ट २०१९ रोजीच्या निवेदनात शेतातील लाईन शेतीची मशागत व शेततळे खोदण्यास अडथळा येत असल्याची कल्पना देण्यात आलेली होती. स्त्याच्या कडेने पोल टाकण्याची विनंती केली होती. मात्र अद्यापही विद्यूत लाईन आहे त्याच स्थितीत आहे.
शेतात लावलेले आंब्याचे, जांभळीचे, कडूलिंबाचे झाडे पोटच्या पोरागत जपून त्याला टँकरने पाणी घालून त्यांनी वाढवले होते कालच्या आगीने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. बाजूलाच ठेवलेला जनावरांचा चारा, गवताचे पेंढे देखील जळून गेल्याने प्रचंड नुकसान झाले. उद्या जनावरांना खायला काय द्यायचे हा पेच शेतकऱ्यांसमोर पडला आहे. आगीमुळे मोहन बऱ्हे, रामकृष्ण बऱ्हे, भास्कर बऱ्हे, अजय बांडे, नितीन परदेशी आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
■ महावितरण कंपनीला दोन वेळेस निवेदन देऊन विद्युतलाईन रस्त्याच्या कडेने टाकण्याबाबत विनंती केली होती। परंतु अजूनही स्थिती जैसे थे च आहे. मी आंबा,जांभूळ, व कडुलिंब आदी झाडांना टँकरने पाणी घालून जगवले होते. सर्व जळून खाक झाले असून याची सर्व नुकसानभरपाई महावितरण कंपनीकडून मिळावी.
– मोहन बऱ्हे, नुकसानग्रस्त शेतकरी, अधरवड
■ घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवणार असून पुढील कार्यवाही लगेच करण्यात येईल.
-श्री. राणे, अभियंता विद्युत वितरण कंपनी, घोटी