
इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारू मोहिमे अंतर्गत धडक कारवाई सुरु केली आहे. जवळच असणाऱ्या मुळेगाव भागात आज सोमवार तारखेला सकाळी ६ वाजेपासून पोलिसांनी १० ते १२ किलोमीटर जंगलात पायी चालत जाऊन गावठी हातभट्ट्या तोडल्या. २ गुन्हे दाखल करण्यात आले असून गावठी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे ३ लाख ४५ हजार इतक्या किमतीचे रसायन आणि गावठी दारू पोलिसांनी यावेळी नष्ट केली. येथील जंगलात असलेल्या दुर्गम भागातील गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर वाडीवऱ्हे पोलिसांनी शोध घेत छापा टाकला. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात आज अवैध दारू बाबत २ गुन्हे दाखल करण्यात आले. यापुढेही ही मोहीम अशीच सुरू राहणार असून कुठेही दारू तयार अथवा विकली जात असेल तर तात्काळ वाडीवऱ्हे पोलिसांशी संपर्क साधावा. या मोहिमेत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस नाईक प्रविण काकड, कांबळे, हेमंत तुपलोंढे, सोनवणे, धोंगडे, पोलीस पाटील संजय जाधव आदी सहभागी झाले होते.