इगतपुरीनामा न्यूज – दारणा नदी काठावरील बोर्ली वाघ्याचीवाडी आणि मानवेढे येथील पाण्याची मोटरपंप आणि अन्य उपयुक्त सेटची चोरी करणाऱ्यांवर इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी आपल्या पथकाच्या मदतीने ६ जणांचा शोध घेऊन त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींकडून पाण्याचे मोटर पंपसेट, मोटार असे साहित्य असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विजय रामचंद्र भागडे, प्रकाश रामदास वीर, आकाश रमेश म्हसणे, आकाश पंढरीनाथ भागडे, राहुल कृष्णा वीर, परवेझ निसार खान अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, सहाय्यक उपनिरीक्षक, रामदास जाधव, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मोरे, प्रकाश कासार, राहुल सहाणे, राहुल साळवे, विजय रुद्रे, राजेंद्र कचरे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्यामुळे चोरट्यांचा शोध लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सांगितले की, इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील बोर्ली वाघ्याचीवाडी आणि मानवेढे येथील दारणा नदीकाठच्या पाण्याच्या मोटरपंप सेट चोरीला गेल्याची तक्रारी भाऊराव ज्ञानेश्वर भागडे, अनिल बच्चू म्हसणे, बबन बुधा भले, ज्ञानेश्वर भागडे, अशोक सोमा खडके या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात केल्या होत्या. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. त्यानुसार आमच्या पोलिसांनी भावडू यशवंत भले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विजय रामचंद्र भागडे, प्रकाश रामदास वीर, आकाश रमेश म्हसणे, आकाश पंढरीनाथ भागडे, राहुल कृष्णा वीर, परवेझ निसार खान या आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार ६ आरोपी ताब्यात घेऊन मुद्धेमाल जप्त केला आहे.