इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पावसाळी हंगामामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन स्थळे आहेत. पर्यटकांची प्रचंड गर्दी मुंबई व नाशिक शहरातुन फार मोठ्या प्रमाणात दोन्ही तालुक्यात शनिवारी व रविवारी गर्दी होत असते. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र पर्यटकांना मज्जाव केल्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. यासह पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पर्यटक व आदिवासींना त्रास होत आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलेली असल्याने स्थानिकांचा रोजगार हिरावला जात आहे. संपुर्ण क्षेत्र हे पेसा अंतर्गत येत असुन स्थानिक आदिवासीसाठी रोजगार निर्मीती होत असते. पर्यटकांना पावसाळ्यात येथील नैसर्गिक सौंदर्य भुरळ घालणारे आहे. त्याचा आनंद घेता यावा यासाठी संपुर्ण क्षेत्रात पर्यटकांना जाण्यास बंदी घालु नये अशी मागणी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावीत यांनी केली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, उप वनसंरक्षक, नाशिक पूर्व व पश्चिम विभाग, नाशिक यांनाही निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत.