हरसुलला माकपचा विविध मागण्यांसाठी मोर्चा ; आशा, गटप्रवर्तक यांचा लक्षणीय सहभाग

ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि.१७

त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हरसूल येथे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सतीश निकम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोना सारख्या महामारीच्या आजाराने सर्वानाच भयभीत करून वर्चस्व निर्माण केले आहे. यामुळे सर्व सामान्यांची आर्थिक घटकासह गळचेपी झाली आहे. यामुळे आर्थिक गणित कोलमडून बिकट परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली. यासाठी त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली हरसूल येथील वन विभाग प्रादेशिक कार्यालय क्षेत्राच्या आवारात सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला.

यावेळी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना शेख यांनी धारेवर धरत विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सतीश निकम यांना दिले. त्यात जीवनावश्यक वस्तूंची महागाई व पेट्रोल डिझेलची महागाई कमी करा, कोरोना बधितांना मोफत उपचाराची सोय करा, शेतकऱ्यांवर लादलेले अन्यायकारक कायदे रद्द करून शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव द्या, ताब्यात असलेल्या वन जमिनी कसणाऱ्याच्या नावावर ( १० एकर पर्यंत ) करा, कोविड काळात कामावर असलेल्या सर्वांना प्रोत्साहन भत्ता व ५०  लाखांचा विमा द्या, आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कामगारांना सरकारी नोकरीत कायम करा आदी मागण्या समाविष्ट आहेत. ग्रामीण भागात सद्यपरिस्थिती कोरोना सारख्या संसर्गाच्या महामारीत चिकनगुनिया सारख्या आजारांनी थैमान घातले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुका आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असून ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर व्याधी जडत आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, हातपाय दुखी सारखे आजार डोके वर काढत असल्याने आरोग्य यंत्रणेने जागे व्हावे. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी दिला. यावेळी आशा,गटप्रर्वतक यांनीही सहभाग नोंदवीत विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सतीश निकम याना दिले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ, उपसभापती देवराम मौळे, माजी सभापती ज्योती राऊत, लक्ष्मण कनोजे, पांडू दुमाडा, गटविकास अधिकारी किरण जाधव, मंडळ अधिकारी सुयोग वाघमारे, तलाठी शरद खोडे, गुलाब चौधरी, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, बालविकास प्रकल्प अधिकारी सागर वाघ, लघु पाटबंधारे विभागाचे रावसाहेब शेवाळे, संदीप खांबाईत, पशुवैद्यकीय अधिकारी संतोष शिंदे, शिक्षण अधिकारी राजेंद्र शिरसाठ, भाऊराज राथड, पुरवठा निरीक्षक राज तडवी, कल्पना शिंदे, पद्मा महाले, संगीता भोये, सविता मिंदे, सोनल गांगुर्डे, कल्पना खोटरे, पुष्पा शिंदे, धनंजया बोरसे, मंगल महाले, मनीषा गायकवाड, अलका तुंगार, रेखा वाघेरे, रेणुका गोतरणे, जिजा बोरसे, देवका वळवी, विमल लिलके आदींसह पदाधिकारी, मोर्चेकरी उपस्थित होते. हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बिडिओना धरले धारेवर

हरसूल येथील मोर्चा दरम्यान विविध मागण्यांसाठी जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांना विविध प्रश्नाचे जाब विचारत त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांना धारेवर धरले. घरकुल हप्ते, खेडेगावात आलेली आजार सदृश स्थिती, दूषित पाणी, पाणीटंचाई नियोजन, शिक्षण, आरोग्य, पाणी, मूलभूत सेवा सुविधाबाबत हलगर्जीपणा, कायदेशीर कारवाईबाबत कमकुवतपणा करून तालुक्याला विकासापासून दूर ठेवले जाते. ग्रामसेवक यांच्यावर वचक नसणे, या साऱ्या गोष्टीबरोबर रुग्णवाहिकेसाठी धारेवर धरले.

जनावरांचे लसीकरण करा

कोरोना काळातील संसर्गाने मानवी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी दिरंगाई करीत आहे. हरसूल सारख्या भागांत पशुसंवर्धन विभागाने पाठ फिरवली आहे. यामुळे जनावरांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. गेल्या महिनाभरात जनावरांचे लसीकरण करावे. अन्यथा येणाऱ्या समस्याला सामोरे जावे असा निर्वाणीचा इशारा इरफान शेख यांनी दिला.