किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
राज्य शासनाच्या ढिसाळ कारभाराने खावटी योजनेची रक्कम लाभार्थ्यांना पोहोचलीच नाही. आदिवासींच्या याजिव्हाळ्याचा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीसमोर आंदोलने करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदी लागू केली. या टाळेबंदीत गोरगरीब आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली. ही उपासमार रोखण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून खावटी योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील भावली बुद्रुक, वाकी, कुऱ्हेगांव, उंबरकोन, बिटुर्ली, चिंचलेखैरे, धारगांव, काळुस्ते, कोरपगांव, उभाडे, पिंपळगाव भटाटा, कावनई अशा तालुक्यातील विविध ग्रामपंचायती समोर आंदोलने करण्यात आली. शासना कडून प्रत्येक लाभार्थ्यांना चार हजार रुपये घेण्यात यावे. यामध्ये दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा आणि दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात येण्याचे जाहीर करण्यात आले. परंतु लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फक्त एक हजार रुपये जमा करण्यात आले. जीवनावश्यक वस्तू मात्र मिळालेल्या नाहीत. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातल्या विविध ग्रामपंचायती समोर आंदोलने करण्यात आली असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा निता गावंडा, तालुका सचिव सुनील वाघ यांनी दिली.