नाशिक मुंबईच्या आरोग्य सुविधा इगतपुरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मिळणार – आमदार हिरामण खोसकर
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
इगतपुरी, शहापूर आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांसह महामार्गावरील अनेक रुग्णांसाठी इगतपुरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्यंत उपयुक्त आहे. अत्याधुनिक आरोग्य सेवा, अनुभवी डॉक्टर आणि सौजन्यशील कर्मचारी ह्या त्रिसूत्रीमुळे इगतपुरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्वांसाठी वरदान ठरणार आहे. ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी भागातील लोकांना सर्व वैद्यकीय सेवा जवळच्या जवळ उपलब्ध झाल्या असल्याचे कौतुक नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केले. इगतपुरी येथे महामार्गापासून हाकेच्या अंतरावरील टिटोली येथे इगतपुरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि जगदंब मेडिकलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणे म्हणजे साक्षात ईश्वर सेवा असून इगतपुरी, शहापूर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रुग्णांना सर्व सुविधा असलेले लाभल्याचे खासदार गोडसे म्हणाले. चांगले रुग्णालय ग्रामीण भागात उभे केल्याने त्याचा सर्वांना चांगला फायदा मिळेल असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, कसारा घाट परिसर, शहापूर, त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक रुग्णांना बहुमोल ठरेल असे हॉस्पिटल उभे राहिल्याने लोकांचे बहुमोल प्राण वाचणार आहेत. नाशिक मुंबई सारख्या आरोग्य सुविधा देणाऱ्या ह्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक करतो. डॉ. अमन नायकवाडी, डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. दत्ता सदगीर, डॉ. अंजुम नायकवडी, डॉ. शैलेश देशपांडे, डॉ. योगेश्वर भागडे, डॉ. मनोज नेटावटे, डॉ. घनश्याम बऱ्हे, डॉ. नेहा नेटावटे यांनी इगतपुरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे केल्याबद्धल आमदार आणि खासदारांनी त्यांचा सन्मान केला.
यावेळी सरपंच अनिल भोपे, जगदंब मेडिकलचे संचालक शाम चव्हाण, रामदास गव्हाणे, प्रशांत भोपे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आमदार हिरामण खोसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, उदय जाधव, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपसभापती विठ्ठल लंगडे, प्रशांत कडू, व्यंकटेश भागडे, धनराज म्हसणे, निलेश भोपे, बाळासाहेब सदगीर, शंकर कडू आदींसह तालुक्यातील असंख पदाधिकारी उपस्थित होते.