पोलीस असल्याची बतावणी करून इगतपुरीत वृद्ध महिलेचे १ लाख ७० हजारांचे दागिने घेऊन पोबारा

किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

आज सकाळी इगतपुरी येथील श्रीराम अपार्टमेंट गांधी चौक येथे राहाणाऱ्या ६५ वर्षीय पार्वती रमेश कांबळे ही महिला गिरजा माता मंदिरा समोरील रस्त्याने पायी चालत दवाखान्यात जात होती. त्यावेळी त्यांच्या जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी आम्ही पोलीस आहोत तुम्ही अशा एकट्याने पायी चालत का जात आहे ? त्यातच तुझ्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत तुला माहीत आहे का ? रात्रीच कोणी तरी एका बाईला चाकू मारला आहे. तुम्ही असे एकटेच फिरत नको. जाऊ तुला पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा. तेंव्हा लागलीच या वयोवृध्द महिलेने घाबरून हातातील ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या किंमत अंदाजे १ लाख २० हजार आणि गळ्यातील गंठण त्यात सोन्याचे मणी किंमत अंदाजे ५० हजार असा एकूण १ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने वृद्धेने काढून पिशवीत ठेवले. या अज्ञात चोरांनी लगेच ते  दागिने हिसकावून मोटरसायकल वरुन पळून गेले. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरांनी वृध्द महिलेला फसवून दागिने हिसकावून पोबारा केल्याने इगतपुरीत महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. डी. पाटील करीत आहेत.