जूनच्या पहिल्याच दिवशीच्या पावसाने बळीराजा सुखावला

इगतपुरीनामा न्यूज, दि. १
जूनच्या पहिल्याच दिवशी इगतपुरी तालुक्यातील विविध भागात पावसाने दमदार सलामी दिली. त्यामुळे बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरवर्षी लांबणाऱ्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असतात. आजच्या पावसाने भाताची लागवड वेळेत होण्यासाठी फायद्याचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे आज लॉकडाऊन शिथिल झाल्याने शेतकरी राजा उपयुक्त साहित्याची खरेदी करण्यासाठी बाहेर पडला. पारंपरिक पीक असणाऱ्या भातासाठी आजचा पाऊस उपयोगी ठरेल असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केले.
धारगाव, इगतपुरी, वाडीवऱ्हे, नांदगाव बुद्रुक, टाकेद बुद्रुक घोटी ह्या महसूल मंडळातील बहुतांशी गावांत पावसाने सलामी दिली. दरवर्षी पावसाची वाट पाहून शेतकरी चिंतातुर होतात. लांबलेल्या पावसामुळे पिकांचे संपूर्ण नियोजन कोसळून पडते. आज जूनच्या पहिल्याच दिवशीच्या पावसाने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला असह्य उकाळा गारव्यात परिवर्तीत झाला आहे. पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला.