
विकास काजळे । इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
मुंबई वरुन नासिकला जाताना महामार्गावर कसारा घाट जेथे संपतो तेथेच उजव्या हाताला ऐतिहासिक गोल घुमटाकार वास्तू दिसून येते. साधारण उलट्या टोपलीच्या आकाराची किंवा घुमट समान दिसणारी ही प्राचीन वास्तू कुणाचेही लक्ष वेधते. मुख्य रस्त्यातून ५० फूट अंतरावर ४० फूट व्यासाची पूर्ण दगडी बांधकाम सुबक पद्धतीने बांधलेली विहीर झाड पाला, जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये तसेच उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यावर तीन बाजूंनी तीन अर्धगोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनवले आहे. दगडी शिळा एकमेकांवर ठेवत महालाच्या घुमटासमान हे छत्र बनवताना बाखेच्या सौंदर्यात अजूनच भर पडते.
वाटसरू किंवा यात्रेकरूंच्या सोयीसाठी या बारवेचा निर्माण लोकमाता पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले आहे. त्यामुळे या घुमटी बारवेला किंवा टोप बारवेला स्थानिक राणी अहिल्यादेवींची बारव या नावाने ओळखतात.
अशा ऐतिहासिक ठेव्याला पुरातत्व विभागाने नेहमीच दुर्लक्षित केले आहे. पुढील पिढ्यांना हा ऐतिहासिक ठेवा तसेच याच महत्त्व समजावे यासाठी पुरातत्व विभागाने विशेष काळजी घेऊन इतिहासाच्या पाऊलखुणा जतन केल्या पाहिजे अशी इगतपुरी तालुक्यातील नागरिकांची अपेक्षा आहे.