कोरपगांव आरोग्य केंद्रातील पदांच्या भरतीला शासनाची मान्यता : आमदार हिरामण खोसकर, गोरख बोडके यांच्या प्रयत्नांना मिळाले यश : आरोग्य केंद्र लवकरच होणार कार्यान्वित

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कोरपगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पदभरतीला राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ह्या आरोग्य केंद्रात विविध प्रवर्गातील पदे भरली जाणार आहेत. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या प्रयत्नांनी त्यांच्याच कार्यकाळात हे आरोग्य केंद्र साकारले असून त्यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी राज्याचे नूतन अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्याकडून पदाच्या भरतीला मान्यता मिळवल्याने ह्या भागातील नागरिकांसाठी सुविधा असणारे आरोग्य केंद्र सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ह्या परिसरात राज्य शासनाच्या आरोग्य सेवेशिवाय दुसरी आरोग्य यंत्रणा नाही. आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची पदे भरले असल्याने रुग्णांना औषधोपचारासाठी खासगी दवाखान्यात जावे लागत होते. आरोग्य केंद्रातील पदाच्या भरतीमुळे केंद्र सुरु होणार असल्याने ह्या भागात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठीकोरपगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस राज्याच्या आरोग्यविभागाने मान्यता प्रदान केली आहे. याचे संपूर्ण श्रेय इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांना जाते. ना. अजित पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यासाठी संबंधित दवाखान्यांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तांत्रिक पदावरील अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती आधी करावी, त्यानंतर अ तांत्रिक पदावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे शासन निर्णयात नमूद आहे. लवकरच यासंदर्भातील पदभरती होऊन आरोग्य केंद्र कार्यान्वित होईल. आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्यसेवक (पुरूष), आरोग्य सहायक (स्त्री), सहायक परिचारिका, प्रसविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, कनिष्ठ लिपीक, स्त्री परिचर, पुरूष परिचर या संवर्गातील प्रत्येकी एक पदाचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनचालक व सफाईगाराचे प्रत्येकी एक पद बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून भरण्यात येणार आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!