कोविडमुळे पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा प्रस्ताव

इगतपुरीनामा न्यूज दि. 28 : पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात घडलेल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या डोक्यावरील आई आणि वडील दोन्ही छत्र हरवले आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील दोन्ही मृत पावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा आघात झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवणे शक्य व्हावे यासाठी त्यांना शासकीय पातळीवर मदत मिळणे आवश्यक आहे.
शालेय शिक्षण विभागाने अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर द्वारे दिली असून सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कोविड मुळे पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. दरम्यान सदरचा प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांनी सादर केलेला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजूरीनंतरच यावर अपेक्षित कार्यवाही केलीय जाणार असल्यामुळे मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.