विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून राज्यभर काम बंद आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ ( समाधान कडवे, वैतरणा )

विविध प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांनी सोमवारी दि. २४ पासुन राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृती समितीमध्ये सहभागी असणाऱ्या सहा संघटनांच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंदोलन काळात हॉस्पिटल व इतर अत्यावश्यक सेवा यांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल. त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही काम करण्यात येणार नाहीत. आंदोलनामुळे औद्योगिक शांतता भंग झाली तर यास शासन व प्रशासन जबाबदार राहील असे संघटनेने कळवले आहे.

वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच ऑनलाईन बैठक झाली. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारच्या फ्रंटवर काम करणारे वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्याची मागणी प्रलंबित आहे. प्राधान्याने लसीकरण केले नसल्यामुळे शेकडो कामगारांचा बळी आणि हजारो कामगारांसह त्यांचे कुटुंबीय बांधित झालेले आहेत. शासनाचे नकारात्मक धोरण असतांनाही वीज कामगार जोखीम पत्करुन कोरोनाचा मुकाबला करत आहे.

संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, अविरत सेवेमुळे ४०० च्या वर वीज कामगार, अभियंते व कंत्राटी कामगार बळी जाऊन त्यांचे कुटुंबही बाधित झाले आहे. असे असूनही चक्रीवादळात विस्कळीत वीज यंत्रणा सुरळीत करण्यासाठी वीज कामगार व अभियंते राबत आहेत. शासनाने संघटनेच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करुन वीज निर्मिती, वहन, वितरण, बिल वसुलीसाठी दबाव तंत्र सुरु केलेले आहे. ऊर्जा विभागाने मेडिक्लेम पॉलिसीत परस्पर टीपीए नेमल्यामुळे असंतोष वाढला आहे. कामगार संघटनांना विश्वासात न घेता तीनच महिने मुदतवाढ दिली आहे. आदी कारणांमुळे संघटनेने ऑनलाईन बैठकीत सोमवार पासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाईन बैठकीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन – आयटक अध्यक्ष मोहन शर्मा, सरचिटणीस कृष्णा भोयर, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ – बीएमएस अध्यक्ष जयप्रकाश होळीकर, सरचिटणीस शंकर पहाडे, बारई अध्यक्ष आर. टी. देवकांत, विघुत क्षेत्र तांञिक कामगार युनियन अध्यक्ष केदार रेळेकर, सरचिटणीस संजय ठाकूर, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अध्यक्ष एन. के. मगर, सरचिटणीस सय्यद जहिरोदीन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस – इंटक अध्यक्ष जयप्रकाश छाजेड,मुख्य महासचिव दत्तात्रय गुट्टे आदी उपस्थित होते.