
इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी तालुका कोरोना निर्मूलनाच्या उंबरठ्यावर असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तालुक्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. कदाचित उद्याच रुग्णांची संख्या २ आकडी होण्याची दाट शक्यता आहे.
आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार २९ कोरोना बाधित व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळवला. ह्या कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला. नव्या १७ संशयित व्यक्तींचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर संपूर्ण इगतपुरी तालुक्यात फक्त १०५ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले की, इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करीत असून नागरिकांनी अधिकाधिक सहयोग दिल्यास कोरोनाचे उच्चाटन करण्याला मदत होईल.
इगतपुरी रुग्णालयाला गोरख बोडकेंकडून मदत
इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात अचानक वीजप्रवाह खंडित होत असल्याने कोरोना रुग्णांसह नातेवाईकांना अंधारात राहावे लागते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरूपा देवरे यांनी ही समस्या माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांना सांगितली. त्यानुसार गोरखभाऊ बोडके युवा फाऊंडेशनच्या प्रयत्नातून आणि कोविड मदत कक्ष ग्रुपच्या सहकार्याने नवीन इन्व्हर्टर आणि ४ नव्या बॅटऱ्या देण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, श्रीकांत काळे, हरिश्चंद्र चव्हाण, विष्णु चव्हाण, संजय कोकणे, नारायण वळकंदे, मनीष भागडे, किरण फलटणकर, वसीम सय्यद आदी उपस्थित होते.

गोरख भाऊ बोडके यांच्या माध्यमातून वेळोवेळी इगतपुरी तालुक्यात कोरोना काळात मदत झाली आहे. खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरणं त्यांनी दाखून दिलेले आहे. त्यांच्या कार्याला आमचा सलाम व इगतपुरीनामा या ऑनलाईन पोर्टलने देखील वेळोवेळी तालुक्यातील कोरोना काळातील परिस्थितीचा आढावा देण्याऱ्या बातम्या, इत्तर महत्वाच्या बातम्या इगतपुरी तालुक्यातील जनसमुदायाला इगतपुरीनामा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याबद्धल त्यांचे देखील आभार. 🙏🙏