मोटर सायकल चोरणारा इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात : चोरीच्या १० मोटर सायकल हस्तगत; पोनि राजू सुर्वे यांनी ४ गुन्हे आणले उघडकीस

 

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते. त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घोटी ते सिन्नर रोडवर सिन्नर फाटा परिसरात सराईत गुन्हेगार गुरूदेव खतेले हा चोरीची पल्सर २२० मोटर सायकल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने घोटीतील सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार गुरूदेव काळू खतेले, वय २६, रा. खडकेद, ता. इगतपुरी यास ताब्यात घेतले. त्याच्या कब्जात मिळून आलेल्या बजाज २२० पल्सर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदरची मोटर सायकल ही गोंदे परिसरातूल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याने त्याचा साथीदार शंकर एकनाथ गांगड, रा. उभाडे, ता. इगतपुरी याचेसह सिन्नर, वाडीवऱ्हे, नाशिक शहरातील अंबड, आडगाव परिसरातून १० मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी गुरूदेव खतेले याच्या कब्जातुन चोरीच्या ९ लाख किमतीच्या १० मोटर सायकल हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीने कबुली दिल्यावरून वाडीवऱ्हे, सिन्नर, अंबड, आडगाव पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपी गुरूदेव काळू खतेले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी खुन, दरोडा तयारी, घरफोडी, चोरी तसेच मोटर सायकल चोरी असे एकुण १२ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. बजाज २२० पल्सर मोटर सायकल चोरण्यात तो तरबेज असल्याचे समोर आले आहे, त्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील गुरनं २६६/२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्ह्यात हजर करण्यात आले असून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, सपोउनि शिवाजी ठोंबरे, पोहवा नवनाथ सानप, चेतन संवस्तरकर, प्रविण सानप, किशोर खराटे, संदिप नागपुरे, पोना विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, चापोकॉ म्हसदे, पोना शिवाजी शिंदे, योगेश यंदे यांच्या पथकाने मोटर सायकल चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!