माजी आमदार झोलेंच्या पाठोपाठ प्रकाश लचके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री आदींची उपस्थिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळकटीकरण होत असून पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे माजी आमदार शिवराम झोले यांच्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश लचके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे, पालकमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या उपस्थितीत प्रकाश लचके यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले. मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी केलेले प्रकाश लचके हे १५ वर्षांपासून वाळविहिर गावात सरपंच आहेत. सलग अनेक वर्षे सोसायटीचे चेअरमन असून बाजार समिती आणि घोटी मर्चंट बँकेचे माजी संचालक आहेत. त्यांच्या प्रवेशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.
गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत माजी आमदार शिवराम झोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रकाश लचके यांनी आज बड्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीचे स्थान भक्कम झाले असून त्यांच्यामाध्यमातून पक्षाला फायदा होणार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची गणिते यामुळे बदलणार आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीची ही सुरुवात मानली जात असून आगामी काळात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग लागणार असल्याचा पुनरुच्चार माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी व्यक्त केला.

येत्या काही दिवसात इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज लोक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. प्रकाश लचके यांच्या पक्षप्रवेशाने इगतपूरी तालुक्यात मोठे पक्ष संघटन वाढेल.
- गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या समर्थकांसह अनेक गावांचे प्रश्न सुटायला मदत होणार आहे. पक्षाची विचारधारा स्वीकारली असून आगामी काळात पक्षासाठी झपाटून काम करणार आहे. क्रमांक एकचा पक्ष ठरलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल.
- प्रकाश लचके, पक्षप्रवेश नेते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!