अवकाळी पावसाने शेतातील शेतीमाल काढतांना शेतकऱ्यांची धावपळ

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ ( निलेश काळे, पिंपळगाव मोर )

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाने नाशिकसह इगतपुरी तालुक्यात चांगलाच जोर धरला आहे. तौक्ते वादळानंतरही दररोज पाऊस बरसत असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले असून शेतातील शेतीमाल बाहेर काढतांना पुरती दमछाक होत आहे.
सतत सुरू असलेल्या रिपरिपीमुळे कामाला मजूरदेखील मिळत नाही. लॉकडाऊनमुळे बाजार विकेंद्रित झालेले आहेत शिवाय पावसामुळे व्यापारी देखील कमी संख्येने येत आहेत.
होळी- धुलीवंदनानंतर लागवड केलेला भाजीपाला आता सुरू होतो आहेत तर काही सुरू होण्यास ८-१० दिवसांचा कालावधी आहे. टोमॅटो, काकडी व वेलवर्गीय पीके तारेवर बांधण्यावाचून पडले आहेत. सोसाट्याचा वारा व पावसामुळे शेतातील माल काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे. भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण, लॉकडाऊन, चक्रीवादळ यांमुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे. वेलवर्गीय व तारेवरील पीके वाऱ्यामुळे जमिनीवर पडले असून पावसामुळे फळे सडत आहेत. एकंदरीत शेतकऱ्याला रब्बी हंगामात गारपीट, लॉकडाऊन व तौक्ती चक्रीवादळाने खरीप हंगामात गुंतवलेले भांडवल निघणे मुश्किल झाले आहे.

तौक्ती चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा व पाऊस पडत असून शेतातील पीके काढण्यासाठी मजूर मिळत नाही. चक्रीवादळामुळे शेतातील टोमॅटो, व काकडी जमीनदोस्त झाली आहे.
  - रामकृष्ण कदम, शेतकरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!